पांढऱ्या पट्ट्यांच्या वादात आता मनसेची एंट्री, कोणाचा तोंडाला फासणार काळं?
मुंबईतील सोसायट्यांमधील पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू झालेल्या वादात आता मनसेने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे सार्वजनिक जागांच्या वापराबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT

मुंबईः मुंबईतील काही भागांमध्ये सार्वजनिक रस्ते आणि गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून निर्माण झालेला वाद आता राजकीय पातळीवरही पोहोचला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत संबंधित प्रकाराला "सांस्कृतिक दहशतवाद" असे संबोधले असून, त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे हा विषय पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
मात्र हा वाद केवळ पांढऱ्या पट्ट्यांपुरता मर्यादित नसून सार्वजनिक जागांचा वापर, धार्मिक श्रद्धा आणि नागरिकांचे समान हक्क या व्यापक मुद्द्यांशी जोडला गेला आहे.
नेमका वाद काय?
मुंबईतील घाटकोपर आणि विद्याविहार परिसरातील काही रस्त्यांवर तसेच काही गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात ऑईल पेंटच्या साहाय्याने लांबच लांब पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्याचे समोर आले. या पट्ट्यांबाबत असे सांगितले जाते की जैन धर्मातील साधुसंत जेव्हा अनुयायांच्या घरी भेट देण्यासाठी जातात, तेव्हा त्यांच्या मार्गावर अशा पट्ट्या आखल्या जातात.
जैन परंपरेनुसार अनेक साधुसंत अनवाणी चालतात. उन्हाळ्यात गरम झालेल्या जमिनीचा त्रास कमी व्हावा, तसेच जीवदयेच्या तत्त्वानुसार चालताना पायाखाली जीवजंतू किंवा शेवाळ चिरडले जाऊ नये, यासाठी या पट्ट्यांचा वापर केला जातो, असे संबंधितांकडून सांगितले जाते.









