'कोर्टाने उलटा निकाल दिला तर आम्ही...', हसन मुश्रीफ बोलता-बोलता सगळंच गेले सांगून!

गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात हसन मुश्रीफ यांनी न्यायालयाच्या संभाव्य निकालाबाबत मोठं विधान केलं आहे. कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास महायुतीचे 12 संचालक पुढील दोन सभांना गैरहजर राहतील, असं त्यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

ncp aji pawar minister hasan mushrif mahayuti gokul election court verdict 12 directors absent next meetings congress hasan mushrif
फाइल फोटो
Google CTA

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांची महत्त्वाची संस्था असलेल्या गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षाला आता वेगळंच वळण मिळण्याची शक्यता आहे. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी न्यायालयाच्या संभाव्य निकालाबाबत मोठं विधान केलं आहे. विशेष म्हणजे, न्यायालयाने अध्यादेश रद्द करून चार संचालकांबाबतचा निर्णय नाकारला, तर आपले 12 संचालक पुढील दोन सभांना गैरहजर राहतील, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

5000 मतं महायुतीला, तर 4900 काँग्रेसला

'5000 पेक्षा जास्त मतदान हे महायुतीला पडलं आणि 4900 मतदान हे काँग्रेसला मिळालं. त्यांना बहुमत मिळालं.. मी अनेक वेळा सांगितलं की, त्यांनी आपला अध्यक्ष निवडावा. 14 चा कोरम पूर्ण करावा. कोरमचा नियम हा काही आम्ही ठरवलेला नव्हता. हा नियम पहिल्यापासून बाय-लॉमध्ये होता. 3 बैठकीत कोरम पूर्ण झाला नाही तर सरकार प्रशासक आणेल. हा काही कायदा आम्ही केला नव्हता. जर आमचे 12 निवडून आले असतील आणि कोरम 14 चा असेल तर आम्ही कोरम करून त्यांचा चेअरमन करण्यासाठी जाण्याचा आदेश जनतेने आम्हाला दिलेला नाही. आम्हाला विरोधी पक्षामध्ये राहण्याचा अधिकार दिलाय.'

हे ही वाचा>> 'त्या' सिलबंद 4 मतांचं काय होणार? गोकुळचा हायकोर्टाचा आदेश समजून घ्या

'पहिली सभा तहकूब झाली. कोर्टाने पुन्हा निवडणुकीचा अजेंडा काढायला सांगितला. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी चांगली पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं. हे वैधानिक संकट सोडविण्यासाठी आम्ही अध्यादेश आणलेला आहे. गोकुळवर कब्जा करण्यासाठी अध्यादेश आणलेला नाही. 25 लोकांच्या हातात सत्ता राहावी म्हणून आम्ही अध्यादेश आणला आहे.' असं मुश्रीफ म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश का आणला? मुश्रीफांनी सांगितलं कारण

'जर दोन्ही पक्षाचे लोक एकत्र बसून हा निर्णय घेणार असतील. तर मी हा अध्यादेश परत घेईल. असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर देखील दुसऱ्या दिवशी पानभर जाहिराती या काँग्रेस नेते बंटी पाटील यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याचं काम केलं.' 

'आम्ही युतीचे नेते संयमाने वागत आहोत. आपल्या भावना व्यक्त करत असताना विजयाचा उन्माद असता कामा नये. आज सुद्धा आमचा चेअरमन झाला असला तरी आम्ही उन्माद करणार नाही.'

हे ही वाचा>> 'गोकुळमध्ये शासननियुक्त संचालक नेमण्याचं षडयंत्र 'त्या' दोन नेत्यांचं', सतेज पाटील मुश्रीफांवर संतापले

'ते भाषणात असंही म्हणाले की, हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी षडयंत्र रचलं. हे खरंय.. मी, चंद्रकांतदादा, प्रकाश आबिटकर साहेब, संजय मंडलिक, राजेंद्र पाटील यड्रावकर.. हे सगळे नेते मंडळी त्यामध्ये आहोत. कदाचित आम्ही दोघांनी पुढाकार घेतला असेल. पण आमचं चुकलं काय?' असा सवाली मुश्रीफांनी यावेळी केला.

कोर्टाचा निकाल विरोधात गेला तर 12 संचालक गैरहजर राहणार?

'समजा, 25 या संचालकाच्या हातात कारभार राहायचा असेल तर याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता. जर 3 मीटिंग आम्ही गैरहजर राहिलो असतो तर प्रशासक आला असता आणि 12 लोकांचंच प्रशासक मंडळ हे मुख्यमंत्री साहेबांनी केलं असतं तर? या 13 लोकांना घरी जावं लागलं असतं. किंवा निवडणूक घ्यावी लागली. या लोकशाही बचाव करण्याचं काम ज्या मुख्यमंत्र्यांनी केलं त्यांचा अपमान करण्याचं काम ही लोकं करत आहेत.'

'आता या गोकुळमध्ये आपली सत्ता आलेली आहे. अजून कोर्टाचा पूर्ण निकाल जरी लागलेला नसला तरी मी न्यायालयाबद्दल काही बोलणार नाही. समजा, दुर्दैवाने हा निकाल उलटा लागला.. तर आपल्यापुढे पर्याय काय? तर परत 2 सभांना गैरहजर राहणं, प्रशासक आणणं 12 लोकांचं आणि या 13 लोकांना घराकडं घालवणं. मी या 13 लोकांना सांगेन.. तुम्हाला निवडून दिलंय.. त्यामुळे तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला कालची बंटी पाटलाची सभा ही शेवटची सभा समजा, नाहीतर शेवटी..' असं मोठं विधान मुश्रीफांनी केलं आहे.

'निकाल 100 टक्के आपल्या बाजूने लागेल'

'कोर्ट असं कधीही म्हणणार नाही की, एखाद्या संस्थेवर ज्याची जमीन शासनाने दिली आहे. ज्याचं भांडवल दिलेल आहे. त्यावर अशी परिस्थिती ठेवावी असं कधीही कोर्ट म्हणणार नाही. निकाल हा 100 टक्के आपल्या बाजूने लागेल.'

'निकाल.. 13 चं बहुमत झालं.. 14 चं कोरम झालं नाही. तर परमेश्वर कोणाच्या बाजूने राहिला? परमेश्वराने कोणाला न्याय दिला? नियती कोणाच्या बाजूने राहिली? परमेश्वर आणि नियती ही प्रामाणिक लोकांच्या मागे राहत असते. दृष्ट कारवाया करणाऱ्यांच्या मागे, कट-कारस्थान करणाऱ्यांच्या मागे आणि जो मदत करेल त्याच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या पाठी परमेश्वर कधीही नसतो. हा निकाल त्याचं उदाहरण आहे हे मी समजतो.' असं जोरदार भाषण हसन मुश्रीफ यांनी यावेळी केलं.

दरम्यान, एकीकडे गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि दुसरीकडे न्यायालयातील कायदेशीर लढाई, अशा दुहेरी संघर्षात गोकुळचं राजकारण अडकलं आहे. त्यातच न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास 12 संचालकांच्या अनुपस्थितीचा पर्याय वापरण्याबाबत मुश्रीफ यांनी केलेल्या विधानामुळे या सत्तासंघर्षाची चर्चा आणखी रंगण्याची शक्यता आहे.