पतीला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली हत्या
Bengaluru Crime News : बंगळुरूमध्ये पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हत्येनंतर पतीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव करण्यात आला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पतीला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव
पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली हत्या
Bengaluru Crime News : अनैतिक संबंधातून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या केली आणि त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव केला. मात्र, शवविच्छेदन अहवालातून या प्रकरणाचे सत्य समोर आले. इलेक्ट्रॉनिक सिटी पोलिसांनी या प्रकरणात 36 वर्षीय अनिता आणि तिचा 48 वर्षीय प्रियकर मधुसूदन रेड्डी यांना अटक केली आहे. मृत व्यक्तीचे नाव उपेंद्र असून त्याचे वय 40 वर्षे होते. 12 ऑक्टोबर रोजी दोड्डाथोगूर येथील राहत्या घरात ही हत्या करण्यात आली.
शवविच्छेदन अहवालातून उपेंद्रचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे स्पष्ट
सुरुवातीला उपेंद्रचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्यात आले होते. त्याचा भाऊ राजेंद्र याने 12 ऑक्टोबर रोजी पोलिसांकडे तक्रार केली होती. उपेंद्र बाथरूममध्ये जाताना घसरून पडला आणि त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. मात्र, शवविच्छेदन अहवालात उपेंद्रचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिसांचा संशय बळावला.
हेही वाचा : जातीवरून शिवी ते तोंडामध्ये लघुशंका? रोहित पठारे हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
अनिता आणि मधुसूदन यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला. कुटुंबीयांची चौकशी, सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल रेकॉर्ड आणि इतर पुराव्यांची तपासणी करण्यात आली. या तपासात अनिता आणि मधुसूदन यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. उपेंद्रला या संबंधांची माहिती होती. यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. उपेंद्र हा आपल्या संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याची भावना अनिता आणि मधुसूदन यांच्या मनात होती. 11 ऑक्टोबरच्या रात्री अनिता आणि उपेंद्र यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. या वादानंतर अनिताने मधुसूदनला फोन करून घरी बोलावले. तसेच पतीची हत्या करण्याचा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवल्याचा आरोप आहे. त्यानंतर मधुसूदन घरात आला आणि बेडरूममध्ये उपेंद्रवर हल्ला केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, मधुसूदनने उपेंद्रला मारहाण केली, तर अनिताने त्याचे तोंड आणि नाक दाबून धरले. त्याचवेळी मधुसूदनने उपेंद्रचा गळा आवळला. यामुळे श्वास गुदमरून उपेंद्रचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर मधुसूदन घरातून निघून गेला. त्यानंतर अनिताने कुटुंबीयांना उपेंद्र बाथरूममध्ये जाताना घसरून पडला आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अशा प्रकारे हत्येचे सत्य लपवून मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शवविच्छेदन अहवालामुळे हा बनाव उघड झाला. त्यानंतर पोलिसांनी पुरावे गोळा करून दोघांच्या भूमिकेचा तपास केला. या तपासातून अनिता आणि मधुसूदन यांनी मिळून उपेंद्रची हत्या केल्याचा संशय बळावला आणि दोघांना अटक करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बसवराज अंगडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून 5 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 अंतर्गत हत्या, कलम 238 अंतर्गत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि कलम 3(5) अंतर्गत समान हेतूने केलेल्या कृत्याशी संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3(2)(v) अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बंगळुरूमधील इलेक्ट्रॉनिक सिटी उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त करणार आहेत. सध्या अनिता आणि मधुसूदन या दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
