'गोकुळमध्ये शासननियुक्त संचालक नेमण्याचं षडयंत्र 'त्या' दोन नेत्यांचं', सतेज पाटील मुश्रीफांवर संतापले
Satej Patil Sangharsh Morcha : गोकुळ दूध संघात शासननियुक्त संचालक नेमण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरात विराट संघर्ष मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफांवर जोरदार टीका केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'गोकुळमध्ये शासननियुक्त संचालक नेमण्याचं षडयंत्र 'त्या' दोन नेत्यांचं'
सतेज पाटील मुश्रीफांवर संतापले
कोल्हापूर : गोकुळ दूध संघामध्ये शासननियुक्त संचालक नेमण्याच्या मुद्यावरून काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. कोल्हापूरच्या दूध संघाच्या निवडणुकीनंतर अध्यक्षपदावरून राजकीय हालचाली सुरू असतानाच राज्य सरकारने चार नव्या संचालकांची नियुक्ती केल्यामुळे गोकुळमधील सत्तासमीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी या निर्णयाविरोधात कोल्हापुरात संघर्ष मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला. हा गोकुळवर ताबा मिळवण्याचा आणि लोकशाही संपवण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे.
'या' दोघांच्या भूमिकेमुळेच 4 संचालक नियुक्त करण्याचा निर्णय झाल्याचा आरोप
गोकुळमध्ये चार संचालकांच्या नियुक्तीवरूनही सतेज पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. या दोघांच्या भूमिकेमुळेच चार संचालक नियुक्त करण्याचा निर्णय झाल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने नियुक्त केलेल्या चार नावांमध्ये शिवाजी दिनकर अडनाईक, डॉक्टर प्रवीण चंद्र हेंद्रे, कृष्णा ज्ञानदेव पाटील आणि सांगलीचे अॅडव्होकेट प्रशांत पाटोळे यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यात एकही पात्र व्यक्ती किंवा दूध उत्पादक मिळाला नाही का, असा सवाल करत सांगलीतील व्यक्तीला गोकुळमध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्त करण्यावर त्यांनी आक्षेप घेतला.
या विराट मोर्च्यामध्ये कोल्हापूरसह सांगली आणि साताऱ्यातील दुग्ध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या या मोर्च्यात विविध प्रतीकात्मक गोष्टी आणि लक्षवेधी घोषणाबाजीमुळे महायुती सरकारविरोधी संताप पाहायला मिळाला. सहकाराचा कायदा पायदळी तुडवून गोकुळवर प्रशासक आणण्याचा घाट घालण्यात आला आणि आता संगनमताने तज्ञ संचालक लादले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. निवडणुकीत बहुमत असतानाही डावलण्याचे प्रकार सुरू असून, सहकार क्षेत्राला कमजोर करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप नेत्यांनी केला.
तज्ञ संचालक म्हणून नेमण्यात आलेल्या नावांवरही तीव्र आक्षेप घेण्यात आला असून, स्थानिक दूध उत्पादक किंवा पात्र व्यक्तींना डावलून इतर ठिकाणच्या व्यक्तींची नेमणूक करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. गोकुळची स्वायत्तता टिकवून ठेवण्यासाठी आणि हा संघ अमूलच्या दावणीला बांधण्याचे प्रकार रोखण्यासाठी ही रस्त्यावरील लढाई तीव्र केली जाईल, असा इशारा देण्यात आला. न्यायालयीन लढाईसोबतच शेतकरी आणि जनतेच्या बळावर हा लढा आणखी तडाखा देऊन सुरूच ठेवणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या संघर्षाची सुरुवात कोल्हापुरातून झाली असली, तरी येत्या काळात सहकार क्षेत्र आणि लोकशाही वाचवण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून मोठा लढा उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोकुळच्या निमित्ताने सुरू झालेली ही जनआंदोलनाची लाट आगामी राजकीय परिवर्तनाचे संकेत देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त करत उद्या सकाळी गोकुळच्या मुख्य कार्यालयासमोर एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. सहकाराचे हित जपण्यासाठी आणि हुकूमशाही निर्णयांना सडेतोड उत्तर देण्यासाठी शेतकरी आणि सभासद पूर्ण ताकदीने एकत्र असल्याचे या मोर्चावरून दिसून आले.
