आधी पवार शिंदेंना भेटले, आता रात्री पाटील 'नंदनवन'वर.. 45 मिनिटांची बैठक अन् चक्रावणारं राजकारण
NCP SP and Eknath Shinde: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी तब्बल 45 मिनिटे बंद दाराआड बैठक घेतली. फडणवीसांनंतर शिंदेंची भेट, शरद पवार यांच्या अलीकडील हालचाली आणि एनडीए प्रवेशाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या घडामोडींना आणखी वेग देणारी एक महत्त्वाची राजकीय भेट आज पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे नेते जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थान 'नंदनवन' येथे 16 मार्च रोजी रात्री उशिरा भेट घेतली. या बैठकीला पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाडही उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.
या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेली बैठक अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे.
45 मिनिटे बंद दाराआड बैठक
माहितीनुसार, जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास 45 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेदरम्यान नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र बैठकीनंतर जयंत पाटील यांनी मर्यादित प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा>> सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; भाजपवर राज ठाकरेंची सडकून टीका
जयंत पाटील यांची अधिकृत प्रतिक्रिया
"नगर विकास खात्यातील आणि माझ्या काही वैयक्तिक कामांसाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भात अपील केल्याचंही त्यांच्या कानावर घातलं."
जयंत पाटील यांनी एवढीच प्रतिक्रिया दिल्याने बैठकीमागील राजकीय अर्थ लावण्याचे प्रयत्न अधिकच वाढले आहेत.










