सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; भाजपवर राज ठाकरेंची सडकून टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवाय त्यांनी मोदी सरकारवर जहरी टीकाही केली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. फेसबुकवर केलेल्या सविस्तर पोस्टमध्ये त्यांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत सरकार आंदोलनांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. तसेच NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेचा अभाव आणि आंदोलनांविषयी सरकारची भूमिका यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राज ठाकरे यांनी म्हटले की, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस असून त्यांच्या प्रकृतीबाबत समोर येणाऱ्या बातम्या आणि सोशल मीडियावरील दृश्ये चिंताजनक आहेत. आंदोलन ही लोकशाहीतील महत्त्वाची जागा असून सरकारने तिचा आदर केला पाहिजे. मात्र, सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
'आंदोलनांकडे सरकारचे दुर्लक्ष'
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, सरकारकडे सत्तेची अमर्याद ताकद असल्यामुळे आंदोलनांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. लोकशाहीतील निष्पक्ष संस्थांवर नियंत्रण मिळवल्याचा आरोप करत त्यांनी निवडणुका, माध्यमांची भूमिका आणि सत्तेच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित केले.
हे ही वाचा>>
त्यांच्या मते, समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलणाऱ्या माध्यमांवर दबाव असल्याने आंदोलनांना योग्य ती दखल मिळत नाही. त्यामुळे एखाद्या चांगल्या उद्देशाने सुरू झालेल्या आंदोलनालाही सहजपणे चिरडले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.










