'प्रफुल पटेलांची NCP चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालीए', भाजपच्या मोठ्या मंत्र्याने केली थेट घोषणा.. महाराष्ट्रात उडाली गडबड!
NCP Praful Patel: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल पटेल यांची नियुक्ती झाली आहे असं पियुष गोयल यांनी जाहीर मुलाखतीत सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: 'राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व हे आधी अजित पवारांकडे होतं आणि आता ते सुनेत्रा पवारांकडे आहे. तसंच प्रफुल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की, त्यांच्याकडून शरद पवारांच्या NCP ला विलिनीकरणासाठी आमंत्रित केलं जाईल. कारण त्यांनी (शरद पवारांच्या NCP ने) जनतेचा विश्वास गमावला आहे.' असं अत्यंत खळबळजनक विधान एका ज्येष्ठ भाजप मंत्र्याने केलं आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
प्रफुल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून ते शरद पवारांच्या NCP सोबत विलिनीकरण करणार नाही.. असं विधान करणारे भाजपचे हे नेते आहेत पियुष गोयल. केंद्रातील राजकारणात भाजपमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये पियुष गोयल यांचा समावेश होतो. त्यामुळेच त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या या विधानावरून आता महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे.
नेमकं काय म्हणाले पियुष गोयल?
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी आपल्याला असं काही होईल असं वाटत नसल्याचं म्हटलं होतं. एका गटाचे नेतृत्व अजित पवार करत होते आणि दुसऱ्या गटाचे नेतृत्व त्यांचे काका शरद पवार करत होते. अजित पवार यांचे दोन दिवसांपूर्वी विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चांना अचानक ब्रेक लागला.
हे ही वाचा>> 'पार्थ पवारांनी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला येऊ नये', भाजपकडून स्पष्ट संदेश.. बारामतीलाच का थांबले पार्थ पवार?
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत गोयल म्हणाले, "NCP च्या विलिनीकरणाबाबत वैयक्तिकरित्या, मला असे होताना दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व पूर्वी अजित पवारांकडे होते आणि आता ते सुनेत्रा पवारांकडे आहे. प्रफुल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मला वाटत नाही की शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले जाईल कारण त्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे."










