पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपने मारली मुसंडी, शिंदेंच्या उमेदवाराला चारली पराभवाची धूळ

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळवला असून, शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा असलेले सचिन सानप यांना पराभवाचा सामना करावा लागला.

ADVERTISEMENT

pune division teachers constituency election result bjp candidates kaustubh gawade defeats shinde shiv sena sachin sanap
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचा विजय
Google CTA

पुणे: पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचा पाठिंबा असलेल्या सचिन सानप यांना पराभव स्वीकारावा लागला. तसंच काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगांवकर यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. या निकालामुळे पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपने आपलं वर्चस्व सिद्ध केलंय.

दरम्यान, या विजयानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या हस्ते कौस्तुभ गावडे यांना विजयाचं प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं.

नेमकं काय घडलं?

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 23 ऑक्टोबर रोजी पार पडली. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा या मतदारसंघात समावेश आहे. शिक्षक मतदारसंघात एकूण 61,940 मतदार नोंदणीकृत होते. त्यापैकी 53,185 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

या निवडणुकीत भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली होती. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिला होता. याशिवाय विद्यमान आमदार आणि काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर तसेच दत्तात्रय सावंत यांच्यासह इतर उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात होते.

हे ही वाचा>> विधान परिषद निवडणुकीचा पहिला निकाल आला हाती, कोणी मिळवला प्रचंड मोठा विजय?

त्यामुळे ही निवडणूक केवळ भाजप विरुद्ध विरोधक अशी मर्यादित राहिली नाही, तर महायुतीतील दोन पक्षांशी संबंधित उमेदवारांमधील स्पर्धाही चर्चेचा विषय ठरली.

पसंतीक्रमाच्या मतमोजणीत गावडेंनी आघाडी टिकवली

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतमोजणी करण्यात आली. या मतदारसंघात एकूण 51,511 मते वैध ठरली होती. विजयासाठी 25,756 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.

पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे निवडणूक नियमांनुसार कमी मते मिळालेल्या उमेदवारांना क्रमाक्रमाने बाद करण्यात आलं आणि त्यांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीची मते संबंधित उमेदवारांकडे वर्ग करण्यात आली.

हे ही वाचा>> विधान परिषद निवडणूक निकाल 2026 LIVE : नागपूर पदवीधर मतदारसंघ मतमोजणी महत्वाची अपडेट

या प्रक्रियेदरम्यान कौस्तुभ गावडे यांनी आपली आघाडी कायम ठेवली. अखेर मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात त्यांचा विजय निश्चित झाला. या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण होण्यासाठी सुमारे 28 तास लागले.

सचिन सानप यांना पराभवाचा धक्का

सचिन सानप यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा पाठिंबा होता. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला महत्त्व प्राप्त झालं होतं. मात्र, मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात कौस्तुभ गावडे यांनी आघाडी कायम ठेवल्याने सानप यांना पराभव स्वीकारावा लागला.

सानप यांनी पराभवाबाबत प्रतिक्रिया देताना शिक्षकांपर्यंत पोहोचण्यात काही बाबतींत कमी पडल्याचं मान्य केलं. शिवसेनेच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले. शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांसाठी काम सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

कोण आहेत कौस्तुभ गावडे?

कौस्तुभ गावडे हे पश्चिम महाराष्ट्रातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. शिक्षकांच्या प्रश्नांशी संबंधित आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. भाजपने त्यांना पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती.

गावडे यांची उमेदवारी जाहीर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केल्याचं वृत्त आहे. प्रचारादरम्यान शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने सहकार्य केलं नाही, तर प्रसंगी रस्त्यावर उतरून लढा देण्याची भूमिका गावडे यांनी मांडली होती.

‘हा माझा नव्हे, सर्व शिक्षकांचा विजय’

विजयानंतर प्रतिक्रिया देताना कौस्तुभ गावडे यांनी हा विजय सर्व शिक्षकांचा असल्याचं म्हटलं. शिक्षकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभार मानले. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी काम करण्याची भूमिका त्यांनी पुन्हा स्पष्ट केली.

तसंच, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न असेल आणि शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं. टीकेला प्रत्युत्तर देण्याऐवजी आपल्या कामातून उत्तर देण्याचा प्रयत्न करणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

शिक्षकांच्या प्रश्नांवर आता लक्ष

कौस्तुभ गावडे यांच्या विजयामुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपला प्रतिनिधित्व मिळालं आहे. मात्र, या विजयासोबतच शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर काम करण्याचं आव्हानही त्यांच्यासमोर असेल. शिक्षकांचे सेवा-संबंधित प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी आणि शिक्षकांच्या हक्कांसाठी विधान परिषदेत आवाज उठवण्याची अपेक्षा त्यांच्याकडून केली जाईल.

एकूणच, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील निकालात कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळवला, तर शिवसेनेचा पाठिंबा असलेले सचिन सानप दुसऱ्या क्रमांकावर राहिले. महायुतीतील अंतर्गत स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या या निकालामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.