Reshma Pardhi Interview : रील्स केल्यानं निलंबन, मग कारवाई मागे घेतली, काय घडलं?
रेश्मा पारधी यांनी अंगणवाडीतील मुलांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट पोषण आहाराबाबत रील्स करून प्रश्न उपस्थित केला. वाटाणा आणि भरडा अनेक शिट्ट्या होऊनही शिजत नसल्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेकडून त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Reshma Pardhi Interview
रील्स केल्यानं निलंबन, मग कारवाई मागे घेतली, काय घडलं?
Reshma Pardhi Interview : एकीकडे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे हे राज्यभरात धाडी टाकून भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नाविरुद्ध धडक कारवाया करत असताना, दुसरीकडे लहान मुलांच्या निकृष्ट आहाराविरोधात आवाज उठवणाऱ्या एका अंगणवाडी सेविकेला थेट नोकरीवरून काढून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबेगाव (जि. पुणे) तालुक्यातील अंगणवाडी सेविका रेशमा पारधी यांनी अंगणवाडीत येणाऱ्या खराब अन्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, मात्र वाढत्या जनक्षोभानंतर आणि माध्यमांच्या दबावानंतर ही कारवाई मागे घेण्यात आल्याचे वृत्त आहे. तरीही, आपल्याला अद्याप कोणतेही अधिकृत पत्र किंवा फोन आलेला नसल्याचे रेशमा पारधी यांनी 'मुंबई तक'शी बोलताना स्पष्ट केले.
काय आहे नेमके प्रकरण?
रेशमा पारधी या गेल्या 18 वर्षांपासून अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. 28 जुलै रोजी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी अंगणवाडीत पुरवल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या कच्च्या मालाचा मुद्दा उपस्थित केला होता. "मुलांना अन्नाचे प्रमाण (क्वांटिटी) एकवेळ कमी द्या, पण उत्तम दर्जाचे (क्वालिटी) अन्न द्या, जेणेकरून बालकांचे कुपोषण थांबेल आणि त्यांना चांगले पोषण मिळेल," अशी कळकळीची विनंती त्यांनी या व्हिडिओद्वारे केली होती. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक करत, आपल्या भागातील हा प्रश्नही वरिष्ठांपर्यंत पोहोचावा याच भावनेने हा व्हिडिओ केल्याचे त्यांनी सांगितले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाकडून चौकशी आणि सुधारणा होण्याऐवजी रेशमा पारधी यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
हे ही वाचा : सेंटर पॉईंट : रेशमा पारधी यांचं निकृष्ट आहारावर व्हिडीओ करणं म्हणजे सरकारची बदनामी?
दोन नोटिसा आणि नोकरीवरून हकालपट्टी
अधिकाऱ्यांनी भेटायला बोलावले असता अधिकृत कार्यालयात न जाता दुसऱ्या ठिकाणी बोलावल्याने त्या गेल्या नाहीत. यावरून 'शिस्तभंग' आणि 'शासकीय कर्मचारी असताना सोशल मीडियाचा गैरवापर करणे' या कारणास्तव त्यांना दोन नोटिसा देण्यात आल्या. त्यांनी 24 तासांत आणि अवघ्या दोन तासांत लेखी खुलासा दिला, मात्र तो अमान्य करत त्यांना थेट 'मानधनी सेवेतून कायमस्वरूपी निष्कासित' करण्याचे आदेश काढण्यात आले.
पर्सनल मोबाईलची तपासणी
चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी अंगणवाडीतील साहित्याची पाहणी करण्यापेक्षा रेशमा यांच्या वैयक्तिक मोबाईलमधील इंस्टाग्राम अकाउंटची तपासणी करून व्हिडिओंची नोंद ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.
