चंद्रपूर : अल्पवयीन मुलीला घरासमोर बोलवून लैंगिक अत्याचार, भाजपच्या मंडल अध्यक्षावर गुन्हा
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपचे चिमूर मंडल अध्यक्ष गजानन गुळधे यांच्याविरोधात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चंद्रपूरमध्ये खळबळ
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
भाजपच्या चिमूर मंडल अध्यक्षाविरोधात गुन्हा
Chandrapur Crime, विकास राजूरकर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार समोर आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पार्टीचे चिमूर मंडल अध्यक्ष आणि आदर्श सातारा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गजानन धनराज गुळधे यांच्याविरोधात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चिमूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन गुळधे हे चिमूर विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार बंटी भांगडिया यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
फरार आरोपीचा शोध सुरु
या प्रकरणी चिमूर पोलीस ठाण्यात आरोपी गजानन गुळधे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) ची कलम 64(अ) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायद्याच्या कलम 4 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई वेगाने सुरू आहे. आरोपी सध्या फरार असून त्याच्या अटकेसाठी ठिकठिकाणी शोध मोहीम राबवली जात आहे.
हे ही वाचा : तारीख अन् वेळ ठरली, गोकुळसाठी आता रस्त्यावरची लढाई; सरकारच्या निर्णयाविरोधात सतेज पाटलांचा संघर्षमोर्चा
युवक काँग्रेसचे आंदोलन
भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यावरच हा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने चिमूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरोपीला तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी चिमूर तालुका काँग्रेस आणि युवक काँग्रेसने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी चिमूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. युवक काँग्रेसच्या नेत्या शिवानी वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, हा अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेशी संबंधित अत्यंत गंभीर विषय असून पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करावी, आरोपीच्या अटकेपर्यंत आणि पीडितेला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील.
हे ही वाचा : "मतं चोरणाऱ्यांनो, शेतकरी काहीच विसरत नाहीत.." 'गोकुळ'वरुन राहुल गांधी आक्रमक, सहकार कायद्यातील दुरुस्तीबद्दल काय म्हणाले?
पोलिसांसमोर आव्हान
सध्या आरोपी गजानन गुळधे फरार असल्याने त्याच्या अटकेचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेमुळे चिमूरमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. आता पोलीस या फरार आरोपीला कधी गजाआड करतात आणि तपासात आणखी काय नवीन माहिती व तथ्ये समोर येतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा : तुळजापूर हादरले! 18 वर्षीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, माजी नगराध्यक्षासह दोघांना अटक
पोलिसांनी काय सांगितलं?
चिमूरचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांनी सांगितले की, या प्रकरणात एक 17 वर्षांची पीडित मुलगी असून तिने तक्रार दिली आहे की, तिच्या गावातील गजानन गुळधे नावाचे माजी सरपंच यांच्याशी तिचे चांगले संबंध होते. याच ओळखीचा गैरफायदा घेऊन, या प्रकरणातील आरोपी असलेल्या गजानन गुळधे यांनी या मुलीला रात्रीच्या वेळी स्वतःच्या घरासमोर बोलावले आणि तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवस मुलगी घाबरलेली होती, त्यामुळे तिने तक्रार केली नाही. नंतर मुलीने ही घटना आपल्या कुटुंबाला सांगितली आणि त्यानंतर ती तिच्या कुटुंबीयांसह आज पोलीस ठाण्यात आली. तिच्या तक्रारीच्या आधारे गजानन गुळधे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 64(A) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (POCSO) कलम 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीचा शोध सुरू आहे.
