शरद पवारांचा राजीनामा : ‘सामना’तून पुन्हा अजित पवारांबद्दल शंका, दोन सवाल
शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर सामना अग्रलेखातून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भाष्य केले असून, काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते हे भाजपत जाण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट सामना संपादकीयातून करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

शरद पवारांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. पवारांनी अचानक हा निर्णय का घेतला? या प्रश्नाभोवती सध्या चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने वेगवेगळे मुद्देही समोर आले असून, सामना अग्रलेखातून ठळकपणे शरद पवारांच्या राजीनाम्या भाष्य करण्यात आलं आहे. पवारांच्या राजीनाम्याची कारणमीमांसा करताना सामनात अजित पवारांचा उल्लेख करत दोन प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “शरद पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. पवार यांच्या निकटवर्तीय म्हणवणाऱ्यांचे असे सांगणे आहे की, साहेब खरं तर 1 मे रोजीच म्हणजे महाराष्ट्र दिनीच निवृत्तीची घोषणा करणार होते, पण मुंबईत महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा असल्याने त्यांनी 2 मे रोजी घोषणा केली. आम्ही या मताशी सहमत नाही. आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’च्या प्रकाशन सोहळ्यासारख्या कार्यक्रमातच निवृत्तीची घोषणा संयुक्तिक आहे.”
हेही वाचा >> अवघं राजकारण ढवळून काढणाऱ्या शरद पवारांच्या राजीनाम्याचे 6 अर्थ…
“आत्मचरित्र हे त्यांच्या जीवन संघर्षाचे, राजकारणाचे सार आहे. त्या पुस्तकाचे न लिहिलेले पान म्हणजे त्यांचा कालचा राजीनामा हे समजून घेतले पाहिजे. पवार यांनी त्यांचे भाषण लिहून आणले होते. असे कधी होत नाही. म्हणजे त्यांच्या भावनिक आवाहनाचा व राजीनाम्याचा मसुदा त्यांनी काळजीपूर्वक तयार करून आणला होता व त्यानुसार त्यांनी सर्व काही केले. शरद पवार यांनी वयाची 80 वर्षे कधीच पार केली आहेत व तरीही पवार हे सक्रिय राजकारणात अविरत क्रियाशील आहेत. पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांच्याच नावाने उभा आहे व चालला आहे”, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
“राष्ट्रवादीतील एक गट भाजपच्या उंबरठ्यापर्यंत”, सामनात मोठा गौप्यस्फोट
अग्रलेखात असंही म्हटलं आहे की, “पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच अनेक प्रमुख नेत्यांनी अश्रू ढाळले, आकांत केला. पवारांच्या चरणाशी लोळण घेतली. ‘तुमच्याशिवाय आम्ही कोण? कसे?’ अशी विलापी भाषा केली. पण यापैकी अनेकांचा एक पाय भाजपात आहे व पक्ष अशा तऱ्हेने फुटलेला बघण्यापेक्षा सन्मानाने निवृत्ती घ्यावी असा सेक्युलर विचार पवारांच्या मनात आला असेल तर त्यात चुकीचे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भारतीय जनता पक्षाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे व राज्याच्या राजकारणात कधीही कोणता भूकंप होऊ शकतो असे वातावरण असताना पवारांनी राजीनामा देऊन धरणीकंप घडवला.”