‘दोन खोमेनी’, अमित शाह, नरेंद्र मोदींबद्दल संजय राऊतांचं स्फोटक विधान
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. राऊत यांनी शाह आणि मोदींचं नाव न घेता अयातुल्लाह खोमेनीसोबत तुलना केली आहे.
ADVERTISEMENT
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधानावरून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलं आहे. “कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत आज प्रत्यक्ष श्री बजरंगबलींना पाचारण केले. पंतप्रधानांकडे मुद्दे नसल्याचे हे उदाहरण. कर्नाटकात भाजप व काँग्रेस पक्षांत तुंबळ युद्ध आहे. पंतप्रधानांनी प्रचारात धर्म आणला, शासकीय यंत्रणा वापरली. भाजपने देशभरचे कॅबिनेट कर्नाटकात उतरवले, पण त्यांचा मुख्य भर ‘हिंदू- मुसलमान’ यावरच आहे”, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर टीकेचे बाण डागले.
ADVERTISEMENT
रोखठोक सदरात खासदार संजय राऊत म्हणतात, “10 मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होत आहे. दक्षिणेतल्या या एकमेव राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. ही सत्ता आता डळमळीत होताना दिसत आहे. बुधवारी मी बेळगावात होतो. विमानतळावर उतरलो तेव्हा भारतीय वायु दलाचे विमान उभे होते. ‘पंतप्रधान मोदी येथे प्रचारासाठी आले आहेत. त्यामुळे विमानतळच ‘एस.पी.जी.’च्या ताब्यात आहे,’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पंतप्रधान पदावरील व्यक्ती सर्व सरकारी लवाजमा घेऊन पक्षाच्या प्रचारासाठी उतरली. पंतप्रधान म्हणून त्यांना राजकीय प्रचारासाठी सर्व सरकारी सुविधा मिळतात. तो कोट्यवधींचा खर्च पक्षाच्या व उमेदवारांच्या खर्चात धरला जात नाही. मात्र विरोधकांना पै पैचा हिशेब द्यावा लागतो.”
‘जय बजरंगबली’, राऊतांनी मोदींवर डागले टीकेचे ‘बाण’
“पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकच्या प्रचारात यावेळी बजरंगबलीस उतरवले. जय बजरंगबलीचे नाव घ्या व भाजपसाठी मतदानाचे बटन दाबा. हा धार्मिक प्रचार आहे. असा धार्मिक प्रचार केल्याबद्दल शिवसेनाप्रमुखांना सहा वर्षांसाठी मतदान करण्यास अपात्र ठरवले होते. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या निवडणुकीत शासकीय कर्मचाऱ्यांचा वापर केला म्हणून अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधी यांची लोकसभेची निवडच रद्द केली. इथे पंतप्रधानांपासून त्यांचे संपूर्ण कॅबिनेट सरकारी यंत्रणेचा वापर करून प्रचारात गुंतले आहे”, असं म्हणत राऊतांनी मोदींना लक्ष्य केलं.
हे वाचलं का?
हेही वाचा >> “पोरं सांभाळायला गेलं, तर टोप पडतो”, उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना डिवचलं
“पंतप्रधानांनी विधानसभा निवडणुकीत हिंदू-मुसलमानांचे कार्ड काढणे अपेक्षित होते. दिल्लीचे बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरण हा काही कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराचा विषय नव्हता, पण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मोदींनी बाटला हाऊस चकमक नव्याने सुरू केली. ते चालले नाही तेव्हा महाबली हनुमानास प्रचारात आणले. अमित शहा म्हणाले, ‘कर्नाटकात भाजप जिंकला नाहीतर दंगली होतील.’ देशात सध्या गोंधळाची परिस्थिती आहे व ती तशीच ठेवली जाईल”, मोठं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
असंख्य खोमेनी निर्माण केले जातील -संजय राऊत
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ‘शुद्ध’ हिंदुहृदयसम्राट होते. त्यांच्या हिंदुत्ववादी विचारात भेसळ नव्हती. त्यावेळी धर्मांध खोमेनी याने लोकशाहीवादी राजवट हटवून इराणची सूत्रे हाती घेतली व आधुनिकतेकडे निघालेल्या इराणच्या विकासात खीळ घातली. धर्माच्या बेड्यांत इराणला पुन्हा जखडले. बाळासाहेब ठाकरे यांना मी तेव्हा खोमेनीबद्दल मत विचारले. बाळासाहेब ताडकन म्हणाले, “मला हिंदूंचा खोमेनी व्हायचे नाही. अजिबात नाही, पण आज देशात जे नव हिंदुत्वाचे (उद्धव ठाकरे यांच्या भाषेत गोमूत्रधारी हिंदुत्व) वातावरण निर्माण केले आहे, त्यामधून देशात दोन खोमेनी निर्माण झालेच आहेत व त्यातून असंख्य खोमेनी निर्माण करून देश इराण, सीरिया, अफगणिस्तानच्या पद्धतीने चालवला जाईल”, असं भाष्य संजय राऊत यांनी रोखठोकमधून केलं आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> ‘अजित पवारांमुळेच शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला असेल’, राज ठाकरे काय बोलले?
संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींनीवर हल्ला चढवताना म्हटलं आहे की, “नऊ वर्षे राज्य करूनही पंतप्रधान मोदी यांना निवडणुका जिंकण्यासाठी श्रीरामापासून बजरंगबलीपर्यंतचे सर्व हिंदू देव लागतात. लोकांना धर्मकारणात धुंद करून नशेबाज करायचे व निवडणुका जिंकायच्या. हिटलर आणि खोमेनीचे हे मिश्रण आहे. देशाला ते परवडणारे नाही. देश अशाने संपून जाईल व पुन्हा कुणाचा तरी गुलाम होईल. या एकाच विचाराने लोकांनी आता एकवटायला हवे. निर्भय व्हायला हवे”, असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT