मंत्री शंभुराज देसाईंचं रक्त काढलं, मराठा आंदोलन लाठीमार अन् बिद्रे प्रकरणातही आरोप आणि दोशी?
मंत्री शंभुराज देसाई यांना धक्काबुक्की करण्यात आल्यानंतर साताऱ्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी हे अचानक चर्चेत आले आहेत. जाणून घ्या त्यांच्याविषयी सविस्तरपणे.
ADVERTISEMENT

सातारा: 'तो एसपी जे वागलाय ना तो घर गड्यासारखा वागलाय, त्याला तात्काळ निलंबित करा. त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत चौकशी करण्याची मागणी करा आणि अरेरावी करणाऱ्या तुषार दोषीला निलंबित करा' अशी मागणी दुसरं तिसरं कुणी नाही तर एका जिल्ह्याच्या पालकमंत्र्यानं केली, कुठं केली तर राज्याच्या सर्वोच्च सभागृहात. हे पालकमंत्री म्हणजे शंभूराज देसाई आणि ते एसपी म्हणजे तुषार दोशी. या जिल्हा पोलीस अधीक्षक असणाऱ्या तुषार दोशींची कारकीर्दच वादग्रस्त आहे. आपल्याला अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण आठवतंय, या प्रकरणापासून ते पुढे मराठा आंदोलकांवरील पहिला लाठीचार्ज ते साताऱ्यातील महिला डॉक्टरचं आत्महत्या प्रकरण ते साताऱ्यातलंच गाजलेलं ड्रग्ज प्रकरण आणि आता झेडपी अध्यक्षपदासाठीचा ड्रामा यामध्ये तुषार दोषींवर गंभीर आरोप झालेत.
नेमकं प्रकरण काय?
या प्रत्येक प्रकरणांमध्ये त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली मात्र ते प्रत्येक वेळी कारवाईपासून वाचल्याचेच दिसून आले. आता मात्र अधिवेशनात मुद्दा गाजल्यानं आणि थेट पालकमंत्र्यांवरच हात घातला असल्यानं दोशींवर कारवाईची चिन्हं निर्माण झाली आहेत. याच तुषार दोशींची वादग्रस्त कारकीर्द जाणून घेऊया
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी पोलिसांकडून पालकमंत्री शंभुराज देसाईंना धक्काबुक्की झाली, अगदी रक्त निघेपर्यंत. याप्रकरणी अधिवेशनात आवाज उठवण्यात आला. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे मंत्री आमदार आक्रमक झाले, यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापतींनी तुषार दोशींच्या निलंबनाचे आदेश दिले. निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाची चौकशी करताना तुषार दोशींच्या या आधीच्या कारकीर्दीचीही चौकशी केली जावी, अशी मागणीच शंभुराज देसाई यांनी केली. अर्थात नंतर निलंबनाच्या आदेशाला राम शिंदेंनी हा निलंबनाचा निर्णय राखीव ठेवत स्थगितीच दिली आहे असं म्हणावं लागेल. असो हे राजकारण चालत राहिल. मात्र यामध्ये तुषार दोशींची वादग्रस्त कारकीर्द चर्चेत आली आहे.
हे ही वाचा>> 'मागील जन्मात तु अप्सरा होतीस, घटस्फोटानंतर दुसरं लग्न करेन...', भोंदू बाबा अशोक खरातचं आणखी एक कांड
एसपी तुषार दोशी हे मूळचे रायगडच्या महाडचे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकले, 2000 साली पोलीस उपअधीक्षक म्हणून निवड झाली. पहिली पोस्टिंग चंद्रपूर नंतर लातूर शहर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई, आणि नंतर जालन्यात काम केलं. 2014 ला आयपीएस म्हणून प्रमोशन झालं. पोलीस अधीक्षक म्हणून पुणे, जालना, रेल्वे पुणे असं काम त्यांनी केलं. पुण्याहून ते सातारा एसपी झाले. आता सातारा एसपी म्हणून आल्यानंतर ते सतत चर्चेत आले. याचं कारण तीन मुख्य प्रकरणं, पहिलं महिला डॉक्टरचं आत्महत्या प्रकरण दुसरं सातारा ड्रग्ज प्रकरण आणि तिसरं आताचा झेडपीचा राडा.









