Shiv Sena सुनावणी : ठाकरेंच्या अधिकारांवरच बोट, शिंदेंच्या युक्तिवादाने नवं वळण? LIVE अपडेट

मुंबई तक

Shivsena hearing : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाच्या युक्तिवादात पक्षप्रमुख पद आणि 2018 च्या पक्षघटनेचा मुद्दा मांडण्यात आलाय.

ADVERTISEMENT

Shiv Sena hearing
Shiv Sena hearing
Google CTA

बातम्या हायलाइट

point

Shiv Sena सुनावणी : ठाकरेंच्या अधिकारांवरच बोट

point

शिंदेंच्या युक्तिवादाने नवं वळण? LIVE अपडेट

Shivsena hearing : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी सुरू झाली आहे. ठाकरे गटाच्या वकिलांच्या वतीने केला जाणारा युक्तीवाद पूर्ण झाला असून गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या सुनावणींमधून शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करण्यात येत आहे. गेल्या सुनावणीमध्ये 2018 च्या पक्षघटनेवरुन जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली होती. आजच्या सुनावणीमध्ये कोणते युक्तिवाद केले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

शिवसेना नाव आणि चिन्ह कोणाचं? या खटल्याच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टात सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद पुढे करताना बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षात प्रथमच ‘पक्षप्रमुख’ ही संकल्पना आल्याचा मुद्दा मांडला. 2018 च्या पक्षघटनेशी ‘पक्षप्रमुख’ पदाच्या मान्यतेचा संबंध नाही, असा युक्तिवाद कौल यांनी केला. 2018 ची पक्षघटना निवडणूक आयोगाला मिळालीच नव्हती. निवडणूक आयोगाने शिवसेनेला पदाधिकाऱ्यांच्या निश्चित कार्यकाळाच्या बाबतीत समान निकष लावले, असा दावा कौल यांनी केला. सध्याचा वाद हा केवळ एकनाथ शिंदे यांच्या नियुक्तीचा नाही. पक्षाचे खरे बळ हे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असते, केवळ एका नेत्यामध्ये नाही, असेही त्यांनी सांगितले.

कौल यांनी पुढे सांगितले की, कार्यकर्त्यांची उपेक्षा झाली आणि लोकशाही प्रक्रिया बिघडली. निवडणुकीत पैशांचा वापर होतो, असे सांगून निवडणुकीऐवजी वेगळ्या पद्धतीने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे पक्षात असंतोष वाढला आणि शिंदे यांनी त्याला विरोध केला. कार्यकर्त्यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला. शिंदे पुढे आले नसते तर कार्यकर्त्यांचा पक्षावरील विश्वास डळमळीत झाला असता, असा युक्तिवाद कौल यांनी केला. राजकीय पक्ष स्वयंसेवी पद्धतीने चालतो, तिथे हुकूमशाही चालत नाही, असेही त्यांनी म्हटले. निवडणूक आयोगाकडे लाखो कार्यकर्त्यांचे शपथपत्र जमा झाले होते. विधिमंडळ स्तरावरही शिंदे गटाचे संख्याबळ अधिक होते, असे कौल यांनी सांगितले.

शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत भूमिका असणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला. राजकीय पक्ष ही ऐच्छिक संघटना असते आणि सदस्य स्वेच्छेने पक्षाच्या घटनेशी बांधील राहतात, असं कौल यांनी सांगितलं. निवडणूक आयोगाने काही मोजक्या लोकांच्या ‘हुकूमशाही’पासून पक्षाच्या कार्यकर्त्यांना संरक्षण दिल्याचाही त्यांनी युक्तिवाद केला.