VIDEO: विधानसभेच्या परिसरात तुफान हाणामारी, पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची कपडे फाटेपर्यंत मारामारी!

मुंबई तक

Gopichand Padalkar vs Jitendra Awhad : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे.

ADVERTISEMENT

gopichand padalkar vs Jitendra Awhad Video of fight goes viral
gopichand padalkar vs Jitendra Awhad Video of fight goes viral
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात तुंबळ हाणामारी

point

खालच्या पातळीवर राजकारण

Gopichand Padalkar vs Jitendra Awhad: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. ज्यावरून राज्याच्या राजकारणाचा दर्जा ढासळ्याची आता सर्वच स्तरातून टीका होत आहे. आमदार जितेंद्र आव्हाडांचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी गोपीचंद पडळकरांचं नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर काल (16 जुलै) गोपीचंद पडळकर यांच्या कारचा आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना धक्का लागला होता. ज्यानंतर तिथे शिवीगाळ देखील झाली होती. या घटनेचे आज थेट विधानसभेच्या परिसरात पडसाद उमटले असून आता दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांची थेट कपडे फाटेपर्यंत हाणामारी झाली. दरम्यान, ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून आता या प्रकरणाचे राजकीय पडसाद हे उमटू लागले आहेत.  

नेमकं काय घडलं?

जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांआधी मंगळसूत्र चोर असं म्हणत गोपीचंद पडळकर यांना डिवचलं होतं. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी अंगावर गाडी घातली असा आरोप काल जितेंद्र आव्हाडांकडून करण्यात आला होता. जिथे शिवीगाळ देखील झाली होती. ज्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. ज्यामध्ये गोपीचंद पडळकर असं म्हणताना दिसत होते की, 'तुझ्यासारखी कुत्री घेऊन फिरत नाही.. मी एकटाच फिरतो..' असं म्हणत जितेंद्र आव्हाडांना सुनावलं होतं.

हे ही वाचा>> विधानभवनाच्या गेटसमोर जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांमध्ये शिवीगाळ

हे सर्व प्रकरण विधानभवनाच्या गेटसमोरच झालं होतं. दरम्यान, काही दिवसांआधी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनीही आमदार भवनातील कॅन्टीन व्यवस्थापकाला मारहाण केली होती. त्यानंतर आता विधानभवनाच्या परिसरातच दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी हाणामारी केल्याने येथील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी तात्काळ विधानसभेत या प्रकरणी मुद्दा उपस्थित केला आणि त्यांनी अध्यक्षांकडे कारवाईची मागणी केली.

कार्यकर्त्यांना मारहाण जितेंद्र आव्हाडांना संताप अनावर

आपल्या कार्यकर्त्यांना विधानसभेच्या परिसरातच मारहाण झाल्याचं समजताच जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना प्रचंड संताप व्यक्त केला. 'जर तुम्ही विधानसभेत गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जीव सुरक्षित नाहीत. मी स्वत: ट्वीट टाकलंय. मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या आहेत. तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर अजून काय-काय लिहिलंय. काय सुरू आहे विधानसभेत?' असा सवाल यावेळी आव्हाडांनी उपस्थित केला.

हे ही वाचा>>  "धर्मांतरासाठी आलेल्यांचा सैराट करा....", बक्षीस जाहीर करत काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

'मी भाषण करून बाहेर आलो.. थोडी मोकळी हवा घ्यायला बाहेर गेलो होतो. मलाच मारण्यासाठी आले होते हे सगळे. म्हणजे विधानसभेत आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार. काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई-बहिणीवरून शिव्या देतो. त्याला अधिकृत भाषा जाहीर करा.. असंसदीय शब्द वापरले जातात करून टाका संसदीय शब्द आहेत म्हणून. सत्तेचा एवढा मुजोरपणा एवढा माज?' असं म्हणत आव्हाडांनी घडल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला.

गोपीचंद पडळकर म्हणाले, 'मी दिलगिरी व्यक्त करतो...'

दुसरीकडे या प्रकरणी जेव्हा पत्रकारांनी गोपीचंद पडळकर यांना विचारणा केली तेव्हा ते म्हणाले की, विधानसभेच्या प्रांगणात जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना आहे. याचं अतीव दु:ख विधानसभा सदस्य म्हणून मला आहे. मी विधानसभा अध्यक्ष आणि सभापती हे आवार त्यांच्या अंतर्गत असल्याने दिलगिरी व्यक्त करतो आणि याविषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून तुमच्याशी बोलतो. अशी प्रतिक्रिया पडळकरांनी दिली.

उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

दरम्यान, या हाणामारी नंतर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, 'ते समर्थक आहेत की, गुंड आहेत? ही जर का या राज्याची परिस्थिती आली असेल तर मग विधानभवनाला अर्थ काय? ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग तो कोणी असेल. ज्यांनी पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर. कारण हा अधिकार अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांचा देखील दिशाभूल केली गेली का? हा पण विषय आहे.'

'मात्र, अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की.. जी गुंडागर्दी ही आता विधानभवनापर्यंत पोहचली असेल तर हे फार अवघड आहे. ताबडतोब गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडावर आणि त्याच्या पोशिंद्यांवर कडक कारवाई केली पाहिजे.'

'तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक, मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात असंच मी म्हणेन.'

'विधानभवनाच्या परिसरात अशा गोष्टी व्हायला लागल्या आणि गुंड आणून मारामाऱ्या व्हायला लागल्या.. हे सगळ्यात पवित्र असं मंदिर आहे. विधानभवनाच्या बाहेर आणि प्रांगणात हे गंभीर आहे. विशेष म्हणजे गुंड आत आणेपर्यंत पाळी जात असेल तर विधानभवनाचं महत्त्व राहिलं काय?' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या प्रकरणी सरकारला धारेवर धरलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp