कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह विरोधातील आंदोलन स्थगित का केलं? काय झाली चर्चा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Why have wrestlers suspended protest against brij bhushan singh? what was the agreement between the sports minister Anurag Thakur and the wrestlers?
Why have wrestlers suspended protest against brij bhushan singh? what was the agreement between the sports minister Anurag Thakur and the wrestlers?
social share
google news

Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी बुधवारी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. अनुराग ठाकूरांसोबत कुस्तीपटूंची तब्बल 5 तास बैठक चालली. क्रीडामंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कुस्तीपटूंनी आपले आंदोलन 15 जूनपर्यंत स्थगित करण्याचे मान्य केले. त्यामुळे सरकारने कुस्तीपटूंना आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारने काय आश्वासने दिली याबद्दल चर्चा सुरू झालीये. तर त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात… (why wrestlers suspended protest)

विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली सर्व कुस्तीपटूंनी कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

ब्रिजभूषण यांच्या अटकेच्या मागणीवर ते ठाम आहेत. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून ब्रिजभूषण विरोधात दोन गुन्हेही दाखल केले आहेत. या प्रकरणांचा सध्या दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Mira Road Murder : लिव्ह इन पार्टनरचे लाकूड कापायच्या मशीनने केले तुकडे

याच दरम्यान, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंना चर्चेसाठी बोलावले होते. ठाकूर यांचे आमंत्रण स्वीकारून ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया, साक्षी मलिक, तिचे पती सत्यव्रत कादियान आणि जितेंद्र किन्हा यांनी बैठकीला हजेरी लावली. यावेळी कुस्तीपटूंनी प्रामुख्याने तीन मागण्या सरकारकडे केल्या.

1) ब्रिजभूषण सिंग यांना अटक करावी.
2) कुस्ती संघटनेची निवडणूक निष्पक्ष व्हावी, अशी कुस्तीप्रेमींची मागणी होती. ब्रिजभूषण यांच्या कुटुंबातील एकही सदस्य कुस्ती संघटनेत नसावा, अशी कुस्तीगीरांची मागणी आहे.
3) 28 मे रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी पैलवानांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत.

ADVERTISEMENT

मोदी सरकारने कुस्तीपटूंना कोणती आश्वासने दिली?

आंदोलक कुस्तीपटूंनी बुधवारी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली आणि 15 जूनपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचे मान्य केले. 15 जूनपर्यंत सिंह यांच्यावर आरोपपत्र दाखल केले जाईल आणि भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) निवडणूक जून महिन्याच्या अखेरीस घेण्यात येईल, असे आश्वासन कुस्तीपटूंना देण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> उद्धव ठाकरेंचे मेहुणे पुन्हा अडचणीत, आता कोणती कारवाई?

– 15 जूनपर्यंत तपास पूर्ण करून पोलीस ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहेत.
– भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) निवडणुका ३० जूनपर्यंत होतील.
– 28 मे रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी पैलवानांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील.
– WFI च्या ICC ची स्थापना केली जाईल आणि एक महिला त्याचे नेतृत्व करेल.

तपास पूर्ण होईपर्यंत पैलवान आंदोलन करणार नाहीत

क्रीडामंत्र्यांची भेट घेतल्यानंतर बजरंग पुनिया यांनी सांगितले की, “सरकारशी चर्चा झाली आहे. 15 जूनपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार नाही. आमच्यावरील खटले मागे घेतले जाणार आहेत. ज्या काही संघटना आमच्याशी निगडीत आहेत, त्यांच्याशी चर्चा करून पुढील माहिती देऊ. 15 तारखेपर्यंत पोलिसांची जी काही प्रक्रिया आहे, ती पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कळवण्यात येणार आहे.”

“पोलीस तपास पूर्ण करेपर्यंत आमचे आंदोलन 15 जूनपर्यंत पुढे ढकलण्यास सांगितले आहे”, असेही साक्षी मलिकने बैठकीनंतर बोलताना सांगितले.

पुढच्या आठवड्यात पोलीस तपास अहवाल न्यायालयात करणार सादर

वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या लैंगिक छळाच्या दोन प्रकरणांची चौकशी करणारी दिल्ली पोलिसांची एसआयटी पुढील आठवड्यात तपास अहवाल न्यायालयात सादर करण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत गोळा केलेले पुरावे पुढील आठवड्यापर्यंत न्यायालयात सादर केले जातील. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी जबाब नोंदवण्यात येत आहेत, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

Video >> “तर दोन फटके ओढायचं काम आम्ही करू”, कोल्हापुरातील मुस्लिम कार्यकर्ता का भडकला?

– एसआयटीने या प्रकरणात आतापर्यंत 180 लोकांची चौकशी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआयटीने आतापर्यंत तक्रारदार, साक्षीदार, सिंह यांचे सहकारी, कर्मचारी आणि कुटुंबीयांसह 180 जणांची चौकशी केली आहे.

– या लोकांना तक्रारकर्त्यांनी केलेले आरोप आणि एफआयआरमध्ये नोंदवलेल्या घटनांबाबत विचारपूस करण्यात आली आहे. गरज भासल्यास पोलीस पुन्हा दिल्ली आणि गोंडा येथील ब्रिजभूषणच्या घरी जाऊन अधिक पुरावे गोळा करू शकतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून सर्व तांत्रिक उपकरणांचा वापर करून तपास करण्यात येत आहे. कॉल डिटेल रेकॉर्डचे विश्लेषण केले जात आहे आणि तपासादरम्यान गोळा केलेले व्हिडिओ आणि छायाचित्रे यांची कसून तपासणी केली जात आहे.

23 एप्रिलपासून कुस्तीपटू रस्त्यावर

विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली सर्व कुस्तीपटूंनी कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात जानेवारीत पहिल्यांदाच आंदोलन सुरू केले. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाच्या मध्यस्थीनंतर कुस्तीपटूंनी सौम्य भूमिका घेतली होती.

त्यानंतर 23 एप्रिल रोजी कुस्तीपटू पुन्हा जंतरमंतरवर धरणे धरले. यासोबतच एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे लैंगिक छळाची तक्रार केली होती. महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून पोलिसांनी ब्रिजभूषणविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले आहेत.

28 मे रोजी पोलिसांकडून धरपकड

कुस्तीपटूंनी 23 एप्रिल ते 28 मे दरम्यान जंतरमंतरवर ठिय्या मांडला. 28 मे रोजी कुस्तीपटूंनी जंतरमंतर ते नवीन संसदेपर्यंत पदयात्रा काढली. या दिवशी पंतप्रधान मोदी नवीन संसदेचे उद्घाटन करत होते. पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नाही. तरीही कुस्तीपटूंनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांशी बाचाबाची व झटापट झाली. यानंतर 28 मे रोजी पोलिसांनी कुस्तीपटूंना आंदोलनस्थळावरून हटवले होते. यासोबतच पोलिसांनी बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता.

अल्पवयीनेन जबाब बदलला

ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करणाऱ्या अल्पवयीन महिला कुस्तीपटूने आपला जबाब बदलला आहे. यापूर्वी तिच्या वक्तव्यात अल्पवयीन महिला कुस्तीपटूने ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता, आता तिने आपले वक्तव्य बदलून कुस्ती संघटनेच्या माजी अध्यक्षांवर भेदभावाचा आरोप केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT