Advertisement

"देशातले शेतकरी, बेरोजगार आणि महिलांची अवस्था बिकट" शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा शरद पवार यांचीच निवड झाली आहे त्यानंतर शरद पवार यांनी हे भाष्य केलं.
The condition of farmers, unemployed and women in the country is bad Sharad Pawar criticizes Prime Minister Modi
The condition of farmers, unemployed and women in the country is bad Sharad Pawar criticizes Prime Minister Modi

देशातले शेतकरी, बेरोजगार तरूण आणि महिलांची अवस्था बिकट आहे. त्यांच्यासाठी या सरकारने ठोस अशी उपाय योजना केलेली नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पुन्हा एकदा शरद पवार यांचीच निवड अध्यक्ष म्हणून झाली आहे. यानंतर बोलत असताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

काय म्हटलं आहे शरद पवार यांनी?

आपल्या समाजाचा एक मोठा भाग तरूणांचा आहे. या तरूणांसमोर सर्वात मोठी समस्या आहे ती बेरोजगारीची. याबाबत मोदी सरकारने काय पावलं उचलली? कायम बेरोजगारीच्या प्रश्नावर देशात चर्चा होत असते. मात्र मोदी सरकारने या तरूणांसाठी जी पावलं उचलली त्यामुळे नवी पिढी निराशच झाली आहे. या तरूणांची निराशा दूर करण्यासाठी मोदी सरकारने ठोस पावलं उचलली नाहीत. त्यामुळे देशातला तरूण वर्ग निराश झाला आहे.

देशातल्या शेतकऱ्यांची अवस्थाही बिकट

कोरोना संसर्गाच्या काळात तीन कृषी कायद्यांवरून देशातलं राजकीय वातावरण तापलं होतं. तिन्ही कायद्यांच्या विरोधात आंदोलन केलं. सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर सरकारने कायदे मागे घेतले. स्वातंत्र्यानंतर देशातले शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन बसतात, एक वर्ष आंदोलन करतात ही दुर्दैवी बाब आहे. शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चाही केली नाही. भारत सरकारने देशाचे संसदेत कायदे मंजूर केले. हे तिन्ही कायदे राज्यसभा आणि लोकसभेत फक्त १० मिनिटात मंजूर केले. याबाबत चर्चा करण्याचा संसदीय अधिकारांचाही स्वीकार करण्यात आला नाही त्यामुळे हा संघर्ष झाला. यानंतर हे तीन कायदे रद्द करण्याची वेळ मोदी सरकारवर आली असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांच्या समस्या अजूनही कायम आहेत

शेतकऱ्यांच्या समस्या अजूनही आहेत. जेव्हा देशात शेती मालाचं उत्पन्न वाढतं तेव्हा शेतकरी किंवा शेतकरी संघटनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाण्याची संधी मिळते. यावर्षी तांदूळ उत्पादन वाढलं आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये तांदूळची कमतरता आहे. अशात स्थितीत शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळू शकले असते. मात्र मोदी सरकारने तांदूळ निर्यातीवर २० टक्के कर लादला. तसंच छोटा तांदूळ निर्यात करण्यावर निर्बंध आणले. अशीही टीका शरद पवार यांनी केली.

देशात महिला सुरक्षेचा प्रश्नही गंभीर

आज देशात महिलांची जी स्थिती आहे त्याबाबत काय बोलायचं? १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यामध्ये महिलांच्या सन्माबाबत भाष्य केलं. मात्र त्यानंतर दोनच दिवसात भाजपची सत्ता असलेल्या गुजरातमध्ये बिल्कीस बानो अत्याचरा प्रकरणातल्या दोषींना मोकाट सोडण्यात आलं. ज्यांनी बिल्कीस बानोवर अत्याचार केले, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ठार केलं अशा ११ दोषींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. मात्र त्यांना सोडण्यात आलं. या सगळ्या समस्यांवर विचार करावा लागेल. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात यावर चर्चा केली जाईल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in