‘मविआ’चा प्रयोग चुकला?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी काय दिलं उत्तर?

मुंबई तक

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, ४० आमदारांचं बंड आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या सरकारवर भाष्य केलं. राक्षसी महत्त्वकांक्षा, हावरटपणा अशा शब्दात ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर नामोल्लेख न करता टीकेचे बाण सोडले. यावेळी ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या प्रयोगाबद्दलही भूमिका मांडली. दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्धव ठाकरेंनी सामनाला मुलाखत दिली. कार्यकारी संपादक संजय राऊतांनी (Sanjay Raut) घेतलेल्या या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, ४० आमदारांचं बंड आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या सरकारवर भाष्य केलं. राक्षसी महत्त्वकांक्षा, हावरटपणा अशा शब्दात ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर नामोल्लेख न करता टीकेचे बाण सोडले. यावेळी ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या प्रयोगाबद्दलही भूमिका मांडली. दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्धव ठाकरेंनी सामनाला मुलाखत दिली. कार्यकारी संपादक संजय राऊतांनी (Sanjay Raut) घेतलेल्या या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या राजकारणाबद्दल आणि एकनाथ शिंदेंच्या बंडावर दीर्घ भाष्य केलं.

उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री होणं चुकलं?

संजय राऊतांनी (Sanjay Raut) उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला की तुमचं मुख्यमंत्री होणं चुकलं? त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले ”दोन गोष्टी आहेत. समजा मी त्यांना त्या वेळेला मुख्यमंत्री केलं असतं. त्यांनी आणखी काहीतरी वेगळं केलं असतं. कारण त्यांची भूकच भागत नाही. त्यांना मुख्यमंत्रीपद पण पाहिजे आणि आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय? शिवसेनाप्रमुखांबरोबर स्वतःची तुलना करायला लागलात? ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. याला हावरटपणा म्हणतात. म्हणजे दिलं तरी माझं ते माझं आणि तुझं तेही माझं, इथपर्यंत होतं. आता याचं तेही माझं आणि त्याचं तेही माझं. इथपर्यंत यांची हाव गेली आहे. या हावरटपणाला काही सीमा नसते.”

शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच मांडली रोखठोक भूमिका; पहा संपूर्ण मुलाखत

संजय राऊत -…की महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला?

उद्धव ठाकरे – महाविकास आघाडीचा प्रयोग जर का चुकला असता तर लोकांनी उठाव केला असता. जनतेनं उठाव केला असता. तसं झालं नाही. जनता आनंदी होती, कारण आल्या आल्याच आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं. त्यानंतर मी अभिमानानं सांगेन की, कोरोना काळात माझ्या मंत्रिमंडळातील सगळ्या सहकाऱ्यांनी, प्रशासनानं आणि जनतेनं उत्तम सहकार्य केलं. म्हणून आणि म्हणूनच देशातील ज्या पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव आलं… मी माझं नाव नाही म्हणत, पण जनतेचा मी प्रतिनिधी म्हणून ते नाव आलं होतं. जर समजा या सगळ्यांनी सहकार्य नसतं केलं, तर मी कोण होतो? मी एकट्याने काय केलं असतं? बरं, मी तर घराच्या बाहेरही पडत नव्हतो. कारण घराबाहेर पडायचं नाही हेच मी लोकांना सांगत होतो”

संजय राऊत – पण फुटिरांचा आक्षेप त्याच्यावरच आहे. जे फुटून गेले आहेत त्यांचा आक्षेप असा आहे की, आपण घराबाहेर पडला नाहीत. आपण मंत्रालयात गेला नाहीत. आपण त्यांना भेटला नाहीत.

उद्धव ठाकरे – “एक मिनीट… घराबाहेर न पडतासुद्धा देशातल्या सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांत नाव का आलं माझं? कारण त्यावेळेला ती परिस्थितीच तशी होती. मी स्वतः सांगत होतो घराबाहेर पडू नका आणि ते लोक ऐकत होते. मी जर का तेव्हा घराबाहेर पडलो असतो किंवा आजही पडलो तरी शिवसेनाप्रमुखांच्या, माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे गर्दी होतेच. म्हणजे मग काय झालं असतं की, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण.”

Uddhav Thackaray : “हिंदुत्वात भागीदार नको म्हणूनच भाजपला शिवसेना संपवायची आहे”

संजय राऊत – महाराष्ट्राच्या जनतेला हा मुख्यमंत्री आपल्या कुटुंबातला घटक वाटत होता. आपल्या परिवारातला भाऊ, मुलगा..

उद्धव ठाकरे – “त्याच्यामुळेच तर या विश्वासघातक्यांना माझ्याबद्दल काय वाटतं याची मला चिंता नाही. माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला मी त्यांच्या कुटुंबातला वाटतो, असं भाग्य फार क्वचित कोणाच्या नशिबी येतं. मला नाही वाटत ते यांच्या नशिबी आलं असेल, कारण यांना काही पदं आता मिळाली तरी अजूनही ‘हम तुम दोनो, एक कमरे मे बंद हो’ असे यांचे मंत्रिमंडळ आहे. त्याचा विस्तार कधी होणार आहे माहिती नाही. पण हे कितीही मंत्रीबिंत्री झाले तरी त्यांच्या कपाळावर जो विश्वासघाताचा शिक्का बसला आहे तो पुसता येणार नाही.”

हे वाचलं का?

    follow whatsapp