
लाव रे तो व्हिडीओ म्हटलं की आठवतात राज ठाकरे! पण चिखलीत आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलतानाही उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ लावला. हा व्हिडीओ ऐकवत देवेंद्र जनाची नाही, तर मनाची तरी लाज बाळगा म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना वीज बिल माफीवरून लक्ष्य केलं.
चिखलीतल्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, "मी जेव्हा दौऱ्याव गेलो होतो, तेव्हा गुडघाभर पाण्यात शेतकरी उभा होता आणि शेतकरी मला विचारत होता की, साहेब, दिवाळी आहे आणि आम्ही खायचं काय ते सांगा? शेतकरी विचारतोय, खायचं काय? जो अन्नदाता आहे, त्या शेतकऱ्याला प्रश्न पडावा की आम्ही खायचं काय? आपले पंतप्रधान म्हणून गेले की, मी रोज दोन तीन किलो शिव्या खातो. तुमचं बरंय हो, शिव्या खाऊन तुमचं पोट भरत असेल. माझ्या शेतकऱ्याचं पोट कसं भरणार हे मला पहिलं सांगा?"
"आज डीपी जळताहेत. किती लोक तुमच्याकडे मदतीला येताहेत? डीपी जळाल्यानंतर तुम्हाला पटकन रिपेअर करून मिळतो. वीज बिलाची वसुली सुरूये की थांबलीये? थांबा एक व्हिडीओ मला मिळालाय, तो तुम्हाला ऐकवतो", असं म्हणत ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांनी मध्य प्रदेश सरकारने केलेल्या वीज बिल माफीबद्दलचा व्हिडीओ लावला.
व्हिडीओ ऐकवल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, 'आवाज आला तुम्हाला? ओळखा पाहू कोण? काय बोलत होते. मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. देवेंद्र जनाची नाही, तर मनाची लाज बाळगा. या ठिकाणी आम्हाला आनंद होतोय की, त्या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांचे साडे सहा हजार कोटींचे वीज बिल भरले आहेत. म्हणून आम्ही या ठिकाणी फोडतोय की त्या ठिकाणी आवाज जाईल,' असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांना कोपरखळी मारली.
'मी त्यांना (देवेंद्र फडणवीस) तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतोय की, या ठिकाणी, त्या ठिकाणी करताहेत ना... तर आज तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि मी या ठिकाणी आहे. करा वीज बिल माफ. महावितरणला तुम्ही पैसे द्या आणि शेतकऱ्याचं वीज बिल माफ करा. होऊन जाऊद्या', असं म्हणत ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर वीज बिल माफीच्या मुद्द्यावरून आव्हान दिलं.