"उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा म्हणजे शिमगा त्यावर काय बोलायचं?" देवेंद्र फडणवीसांचा टोला

वाचा सविस्तर बातमी नेमकं काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याबाबत
Uddhav Thackeray's Dussehra gathering is like Shimga has to say about it? Asks  Devendra Fadnavis
Uddhav Thackeray's Dussehra gathering is like Shimga has to say about it? Asks Devendra Fadnavis

उद्धव ठाकरेंचा मेळावा म्हणजे शिमगा होता. शिमग्याबाबत काय बोलायचं? शिमग्यावर काहीही प्रतिक्रिया द्यायची नसते त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भाषणावर मी काहीही बोलणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांचे मेळावे पार पडले. यात एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला जी गर्दी झाली होती त्यामुळे खऱी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे हे सिद्ध झालं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?

मी दसऱ्याच्या दिवशी नागपूरमध्ये होतो. मी दोन्ही नेत्यांची भाषणं ऐकली नाही. पण भाषणांचा थोडा थोडा सारांश ऐकला. मी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर काहीही प्रतिक्रिया देणार नाही. याचं कारण म्हणजे शिमग्यावर काय बोलणार? उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे शिमगा होता. त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज मला वाटत नाही.

खरी शिवसेना कुणाची ते महाराष्ट्राला कळलं आहे

बांद्रा-कुर्ला संकुलात जे मैदान आहे त्या मैदानाची क्षमता शिवाजी पार्कच्या दुप्पट आहे. ते संपूर्ण मैदान भरलं होतं. शिवाजी पार्कच्या दुप्पट गर्दी बीकेसीला झाली होती. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची आहे हे महाराष्ट्राला समजलं असंही एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर विधानसभा निवडणूक असो किंवा मुंबई महापालिका निवडणूक या निवडणुकांमध्ये भगवाच फडकणार आहे. हा भगवा झेंडा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या खऱ्या शिवसेनेचा फडकणार आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी काय सल्ला दिला?

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात जे भाषण केल त्या भाषणात त्यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर तर टीका केलीच. त्याशिवाय त्यांनी भाजपवरही टीका केली. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरेंना आता त्यांचा स्क्रिप्ट रायटर बदलायची गरज आहे. उद्धव ठाकरेंची तीच ती भाषणं ऐकून आम्हाला कंटाळा आला. शिवसेनाचा मूळ विचार सोडून उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीचा विचार स्वीकारला. तसंच सावरकरांवर टीका करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसले आणि दाऊदशी हात मिळवणाऱ्यांना मंत्रिपदं दिली म्हणून ही वेळ आज उद्धव ठाकरेंवर आली आहे असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाच्या मुद्द्यावरही भर दिला हे महत्त्वाचं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात जे भाषण केलं त्या भाषणात त्यांनी विकासाचेही मुद्दे मांडले. आम्ही काय केलं? भविष्यात काय करणार आहोत हेदेखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हाही पक्षप्रमुखांचंच भाषण करायचे. एकनाथ शिंदे यांच्या भाषणात मात्र राज्याच्या विकासाचेही मुद्दे होते असंही देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in