सुप्रिया सुळेही बसल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत? काय आहे 'या' फोटोमागचं सत्य?

जाणून घ्या नेमकं काय आहे या फोटोमागचं सत्य?
Was Supriya Sule also sitting in the Chief Minister's chair? What is the truth behind this photo?
Was Supriya Sule also sitting in the Chief Minister's chair? What is the truth behind this photo?

खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत बसले आहेत असा फोटो शुक्रवारी व्हायरल झाला होता. राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्विट केला होता आणि श्रीकांत शिंदे सुपर सीएम झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा असं खोचक ट्विटही केलं होतं. त्यानंतर शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या काळात सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्या आहेत असा फोटो ट्विट केला. या फोटोवरून राजकारण रंगलं आहे. यामागचं सत्य काय आपण जाणून घेऊ.

शीतल म्हात्रे यांनी ट्विट केलेल्या फोटोत काय आहे?

शीतल म्हात्रे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातला फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्या आहेत असं दिसतं आहे. त्यांच्या शेजारी त्यावेळी आरोग्य मंत्री असलेले राजेश टोपे आणि गृहमंत्री असलेले दिलीप वळसे पाटीलही बसल्याचं दिसतं आहे. महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावर ट्विट करत हा फोटो बघा कोण कुणाच्या खुर्चीत बसलंय? असा प्रश्न विचारत शीतल म्हात्रे यांनी हा फोटो ट्विट केला आहे.

आदिती नलावडे यांनी काय म्हटलं आहे? तसंच तक्रार का केली आहे?

शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा फोटो ट्विट करताच ऱाष्ट्रवादीच्या आदिती नलावडे यांनी हा फोटो मॉर्फ केल्याचं म्हटलं आहे आणि शीतल म्हात्रे यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार दिली आहे. … आता त्यांना सांगा काय ते Editing, काय ते Morphing, सर्व कसं ओके करणार आहेत पोलीस असं ट्विट करत वरळी पोलीस ठाण्यात शीतल म्हात्रेंच्या विरोधात केलेली तक्रार आदिती नलावडे यांनी ट्विट केली आहे.

प्रवीणकुमार बिरादार यांनी ट्विट केला ओरिजनल फोटो

युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीणकुमार बिरादार यांनीही याच फोटो संदर्भात ट्विट करत ओरिजनल फोटो काय आहे आणि त्याचं मॉर्फिंग कसं केलं गेलं आहे ते ट्विट केलं आहे. एवढंच नाही तर शिंदे गटावर टीकाही केली आहे. वाण नाही पण गुण लागला,शिंदेसेना भाजपच्या नादाला लागून आता फोटोशॉप सेना झाली आहे. हा घ्या पुरावा.

श्रीकांत शिंदे यांचा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसने पोस्ट केला होता. जो चांगलाच व्हायरलही झाला. ज्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी याविषयी स्पष्टीकरणही दिलं.

काय म्हणाले खासदार श्रीकांत शिंदे?

श्रीकांत शिंदे म्हणाले, ही हास्यास्पद बाब असून विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्यामुळे ते अशा प्रकारे काही ना काही मुद्दे उचलत आहेत. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे सक्षम आहेत. ते 18-18 तास काम करतात. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत सुपर सीएम म्हणून काम करण्याची कोणालाही काहीही गरज नाही.

तसेच जो फोटो व्हायरल केला आहे, तो आमच्या निवासस्थानचा आहे. ठाण्याच्या लुईसवाडीच्या घरातील ते ऑफिस आहे. मी ज्या खुर्चीवर बसलो ती खुर्ची माझी आहे. मात्र शिंदे साहेबही या खुर्चीचा वापर करतात. ते मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासून या कार्यालयाचा वापर करतात. हजारो लोक इथे येतात. इथून जनतेचे प्रश्न सोडवतात.

श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. तरीही शीतल म्हात्रे यांनी एक फोटो ट्विट केला त्यात सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचं दिसून येतं आहे. मात्र या फोटोमागचं नेमकं सत्य काय हे या बातमीवरून वाचकांना समजलं आहेच.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in