बाळासाहेब ठाकरे नेमके कुणाचे? उद्धव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदेंचे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बाळासाहेब ठाकरे नेमके कुणाचे? हा प्रश्न महाराष्ट्रात सध्या निर्माण झाला आहे. २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं त्यात त्यांनी हेच म्हटलं आहे की आम्ही बाळासाहेबांचा वारसा आणि विचार पुढे जात आहोत असं म्हटलं होतं. ते सातत्याने तेच म्हणत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून शिवसेना भरकटली म्हणून आम्ही शिवसेनेत तो विचार पुढे घेऊन जातो आहोत असं एकनाथ शिंदे यांनी सातत्याने म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं बाळासाहेब ठाकरेंविषयी काय म्हटलं आहे?

जे स्वप्न मुंबईकरांच्या मनातील मुंबईसाठी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करायचे ही आता आपली जबाबदारी आहे. कारण त्यांचं नाव सांगून जे निवडून आले त्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न धुळीस मिळवलं. ते स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. ते इतके आत्ममग्न आणि इतके आत्मकेंद्रीत होते की ते स्वतःच्या पलिकडे काहीही पाहू शकले नाहीत. मुंबई आणि मुंबईकरांकडे त्यांनी पाहिलं नाही. आता मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना आपण निवडून आणायचं आहे. मुंबईकरांनी जे स्वप्न पाहिलं आहे, जे स्वप्न वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलं आहे ते पूर्ण करण्याचं काम आता आपल्याला करायचं आहे. असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘त्या’ फॉर्म्युल्यावरच उद्धव ठाकरे पुन्हा करत आहेत शिवसेनेची उभारणी

राज ठाकरेंनी बाळासाहेबांचा विचार आणि वारसा याबाबत काय म्हटलं आहे?

वारसा कुठला असतो तर तो वास्तूचा नसतो तो विचारांचा असतो. कोण कुठल्या वास्तूमध्ये आहे त्यावरून वारसा ठरत नाही. वारसा विचारांचा पुढे घेऊन जावा लागतो. आमच्या शिवछत्रपतींनी जो विचार दिला तो पेशव्यांनी अटोक किल्ल्यापर्यंत नेला. अटोक किल्ला आत्ता पाकिस्तानात आहे. महाराजांचा विचार पोहचवला कुणी? पेशव्यांनी. पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली होती? पेशव्यांच्या हातामध्ये संपूर्ण सत्ता होती. या पेशव्यांनी कधीही स्वतःला छत्रपती नाही म्हणवून घेतलं. छत्रपती तेच, आम्ही त्यांचे नोकर असं त्यांचं म्हणणं होतं. छत्रपती तेच, गादी तीच फक्त त्यांचा विचार पोहचवतो आहोत असं राज ठाकरे म्हणाले.

ADVERTISEMENT

माझ्या आजोबांचा, माननीय बाळासाहेबांचा जो विचार आहे तो विचार मला पुढे न्यायचा आहे. माझ्याकडे निशाणी असली काय आणि नसली काय? मला काही फरक पडत नाही. माझ्याकडे विचार आहेत. सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे माझ्याकडे ती म्हणजे हे विचार. बाकीचं सगळं सोडा पण विचारांच्या बाबतीत मी श्रीमंत आहे. या महाराष्ट्रात ज्या लोकांनी, ज्या महापुरूषांनी जे विचार पेरले ते ऐकणं, बोध घेणं ही गोष्ट प्रत्येकाने करणं गरजेचं आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही -उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केलेल्यांना क्षमा नाही असं म्हणत आहेत. राज्यात हे बंड झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता आणि त्यांच्याच मुलाला तुम्ही खुर्चीवरून उठवता हे तुम्हाला योग्य वाटतं का? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला होता. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आणि विचार याबाबत चार नेते भूमिका मांडत आहेत. अशात बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा कोण चालवतंय हा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर बाळासाहेब ठाकरे हे राज्यातल्या हिंदुत्वाचा चेहरा झाले होते. कारण १९८७ नंतर गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा बाळासाहेबांनी दिली आणि त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा लागला. त्यानंतर हिंदुहृदय सम्राट हे बिरूदही त्यांच्या नावापुढे कायम लागलं. अत्यंत स्पष्टवक्त्या स्वभावामुळे त्यांनी ही इमेज तयार केली होती. २०१२ मध्ये जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं. त्यानंतर शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरेंकडे आली. त्यावेळी राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा आत्ता इतका उचलून धरला नव्हता. मात्र नरेंद्र मोदींचा उदय झाला होता हेदेखील मान्य करावं लागेल.

२०१९ मध्ये नेमकं काय घडलं?

२०१९ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात न भूतो न भविष्यती असा महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. ज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष सत्तेसाठी एकत्र आले. याच मुद्द्यामुळे हिंदुत्वापासून शिवसेना दूर गेली हे भाजपने सातत्याने टीका करून सांगितलं. तसंच त्यामुळे निर्माण झालेली स्पेस मनसेने व्यापण्याचा पूर्ण प्रयत्न केला.

२०२२ मध्ये काय होते आहे ही चर्चा?

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पुढे नेत आहोत हे एकनाथ शिंदे सातत्याने सांगत आहेत. तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे गद्दारांना क्षमा करता येणार नाही म्हणत बाळासाहेबांच्या विचारांशी एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केल्याचं सांगत आहेत. भाजपकडून हा दावा केला जातो आहे की बाळासाहेब ठाकरेंचं मुंबईबाबतचं स्वप्न आम्हीच पूर्ण करणार. तर राज ठाकरेंनी हा दावा केला आहे की माझ्याकडे निशाणी नसली तरीही चालणार आहे प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मी पुढे घेऊन जातो आहे. त्यामुळे हे लक्षात येतं आहे बाळासाहेब ठाकरेंच्या नावाभोवतीच येत्या काळातलं राजकारण फिरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT