
कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी एकतर्फी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाला फक्त 100 धावांचं लक्ष मिळालं होतं, प्रत्युत्तरात स्मृती मंधानाच्या वादळी खेळीच्या जोरावर टीम इंडियानं ते सहज साध्य केलं, स्मृतीनं विजयी सिक्सर लगावत मॅच संपवली. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचा हा पहिला विजय आहे.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी चुकीचा ठरला. पावसामुळे सामना 18 षटकांचा करण्यात आला, त्यानंतर पाकिस्तानी संघ भारतीय गोलंदाजांसमोर पत्त्यासारखा कोसळला. पाकिस्तानने 18 षटकात 99 धावा केल्या आणि संपूर्ण संघ बाद झाला. प्रत्युत्तरात भारताने 12व्या षटकात केवळ दोन गडी गमावून विजय मिळवला.
टीम इंडियाची फलंदाजीने सुरू झाली तेव्हा स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि शेफाली वर्मा यांनी टीमला जबरदस्त सुरुवात करून दिली. शेफाली वर्मा 9 चेंडूत 16 धावा करून बाद झाली, यादरम्यान तिने शानदार षटकारही लगावला. शेफाली आणि स्मृती यांच्यात अवघ्या 35 चेंडूत 64 धावांची भागीदारी झाली.
स्मृती मानधनाबद्दल बोलायचे झाले तर तिने अवघ्या 42 चेंडूत 63 धावांची जलद खेळी केली. स्मृतीने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार मारले. बऱ्याच दिवसांपासून मोठ्या इनिंगची वाट पाहणाऱ्या स्मृती मंधानाने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चुराडा केला.
या मोठ्या विजयासह टीम इंडिया आपल्या गटात अव्वल स्थानावर पोहोचली आहे. भारताचे दोन गुण आहेत, पण नेट-रन रेट खूप जास्त आहे. पाकिस्तानने आपले सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले असून ते पॉईंट टेबलमध्ये तळाशी आहेत.
पाकिस्तानचा संघ अवघ्या 99 धावांत ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीने सर्वाधिक 32 धावा केल्या. तर संघाच्या 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भारताकडून स्नेह राणा, राधा यादव यांनी 2-2 तर रेणुका-मेघना आणि शेफाली यांनी 1-1 विकेट घेतली.