इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने सावध सुरुवात केली आहे. इंग्लंडला पहिल्या डावात १८३ धावांवर रोखल्यानंतर भारताने दिवसाअखेरीस एकही विकेट न गमावता २१ धावांपर्यंत मजल मारली आहे. इंग्लंडला २०० धावांच्या आत गुंडाळल्यामुळे भारताला नॉटिंगहॅम कसोटीत पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी आहे.
मयांक अग्रवालच्या गैरहजेरील रोहित शर्माच्या सोबत लोकेश राहुलने भारतीय डावाची सुरुवात केली. दोन्ही भारतीय फलंदाजांनी अखेरच्या सत्रात फारशी जोखीम न स्विकारता सावध खेळणं पसंत केलं. दोन्ही फलंदाज दिवसाअखेरीस ९ धावांवर नाबाद आहेत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारतीय संघाकडे आपली आघाडी वाढवण्याची चांगली संधी आहे.
त्याआधी, टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा इंग्लंडचा निर्णय पूरता फसला. जसप्रीत बुमराहने पहिल्याच प्रयत्नात इंग्लंडचा ओपनर रोरी बर्न्सला आऊट करत इंग्लंडला धक्का दिला. यानंतर मधल्या फळीत इंग्लंडचे काही फलंदाज आणि अखेरच्या फळीत सॅम करनचा अपवाद वगळता सर्वांनी निराशा केली. भारतीय बॉलर्सनी मोक्याच्या क्षणी इंग्लंडची जमलेली जोडी फोडत सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं.
इंग्लंडकडून कॅप्टन जो रुटने भारतीय बॉलर्सचा सामना करत एकाकी झुंज दिली. त्याने १०८ बॉलमध्ये ११ फोर लगावत ६४ रन्स केल्या. या इनिंगदरम्यान अनेक विक्रमांची नोंद झाली. इंग्लंडचे ४ बॅट्समन शून्यावर आऊट झाले. सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर येणाऱ्या डॅन लॉरेन्स आणि जोस बटलर यांना लागोपाठ शून्यावर पाठवण्यात भारतीय बॉलर्सना यश आलं.