रोहित शर्माला कॅच पकडताना गंभीर दुखापत; मॅचच्या मध्येच जावं लागलं रुग्णालयात

दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर रोहितने अनामूल हकचा झेल सोडला आणि यादरम्यान त्याच्या डाव्या हातातून रक्तस्त्राव सुरू झाला.
रोहित शर्माला कॅच पकडताना गंभीर दुखापत; मॅचच्या मध्येच जावं लागलं रुग्णालयात

भारतीय कर्णधार रोहित शर्माला बुधवारी बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे दरम्यान कॅच घेण्याच्या प्रयत्नात डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. दुसऱ्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना मोहम्मद सिराजच्या डावातील दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर रोहितने अनामूल हकचा झेल सोडला आणि यादरम्यान त्याच्या डाव्या हातातून रक्तस्त्राव सुरू झाला.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विट केले की, "भारतीय कर्णधार रोहित शर्माला दुसऱ्या वनडेत क्षेत्ररक्षण करताना अंगठ्याला दुखापत झाली. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याचे मूल्यांकन करत असून, त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले आहे.

रोहितची दुखापत आणि भारताला झटका

बांगलादेशने पहिला एकदिवसीय सामना एका विकेटने जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. रोहित शर्माची दुखापत गंभीर ठरली तर टीम इंडियासाठी तो मोठा धक्का ठरू शकतो. कारण एकदिवसीय मालिकेला अजून एक सामना बाकी आहे, तसेच त्यानंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका बाकी आहे. कसोटी मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व फक्त रोहित शर्मा करणार आहे.

बांग्लादेश दौऱ्यावर टीम इंडियाची समस्या वाढली

T20 वर्ल्ड कप 2022 नंतर रोहित शर्मा ब्रेक घेऊन पुनरागमन करत आहे. तो टीम इंडियासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर गेला नव्हता. रोहित बांगलादेश दौऱ्यासाठी परतला आहे, जिथे पहिल्या वनडेत टीम इंडियाचा एका विकेटने पराभव झाला. आता दुसऱ्या वनडेत रोहित शर्माला दुखापत झाली आहे. बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियासाठी सतत वाईट बातमी येत आहे. मालिका सुरू होण्यापूर्वीच ऋषभ पंतला संघातून वगळण्यात आले होते. वैद्यकीय पथकाच्या सल्ल्याने ऋषभ पंतला रिलीज करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली होती. याशिवाय कुलदीप सेनच्या पाठीतही काही समस्या निर्माण झाल्यामुळे तो दुसऱ्या वनडेत निवडीसाठी उपलब्ध नव्हता.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in