SA vs Ned : अविश्वसनीय! नेदरलँडचा सर्वात मोठा धमाका, आफ्रिकेला लोळवलं
नेदरलँड क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विश्वचषक 2023 मधील सर्वात मोठा धमाक केला. क्वालिफायरमधून आलेल्या नेदरलँड संघाचा विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील हा तिसरा विजय आहे.
ADVERTISEMENT

South Africa vs Netherlands Odi : नेदरलँड क्रिकेट संघाने इतिहास रचला. २०२३ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव केला. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये 14व्या क्रमांकावर असलेल्या नेदरलँड संघाने या स्पर्धेतील सर्वात मोठी कामगिरी केली. आयसीसी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेची बाद फेरीच्या सामन्यांपूर्वीच दमछाक झाल्याचं दिसलं. 246 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 207 धावांवरच गारद झाला. त्याच्या पराभवाची स्क्रिप्ट एकेकाळी दक्षिण आफ्रिकेकडून खेळलेल्या रॉल्फ व्हॅन डर मर्वेने लिहिली होती. त्याने टेम्बा बावुमा आणि रॅसी व्हॅन डर डुसेनच्या दोन मोठ्या विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, स्कॉट एडवर्ड्सच्या कर्णधार खेळीमुळे नेदरलँड्सने आठ गडी गमावून 245 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्याने 69 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारासह 78 धावांची नाबाद खेळी खेळली आणि संघाला सात विकेट्सवर 140 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यांच्याशिवाय 10व्या क्रमांकाचा फलंदाज आर्यन दत्तने नऊ चेंडूत तीन षटकारांसह 23 धावांची नाबाद खेळी केली आणि रुल्फ व्हॅन डर मर्वेने 29 धावा काढल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॉन्सन, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. पावसामुळे खेळ उशिरा सुरू झाला, त्यामुळे सामना 43 षटकांचा करण्यात आला.
नेदरलँडचा विश्वचषकातील तिसरा विजय
विश्वचषकाच्या इतिहासात नेदरलँडचा हा केवळ तिसरा विजय आहे. दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यापूर्वी, त्यांना पाच विश्वचषक स्पर्धा आणि 22 सामन्यांमध्ये केवळ नामिबिया आणि स्कॉटलंडचा पराभव करता आलेला आहे. नेदरलँड संघाने क्वालिफायर खेळून 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवलेला आहे. त्यांनी वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेसारख्या मोठ्या संघांना पराभूत केले होते.
हेही वाचा >> मुंबईत ऑनर किलिंग : आधी जावयाची सपासप वार करत हत्या, नंतर मुलीला ठेचून मारलं!
या संघाने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 विश्वचषकातही प्रोटीज संघाचा पराभव केला होता. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका तिसऱ्यांदा 50 षटकांच्या विश्वचषकात पुन्हा एकदा कमकुवत ठरली. या सामन्याच्या निमित्ताने विश्वचषकात दुसरा धमाका पाहायला मिळाला. यापूर्वी 15 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडचा 69 धावांनी पराभव केला होता.










