SA vs IND : पालघरचा शार्दुल ठाकूर चमकला, ७ विकेट घेत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी
जोहान्सबर्ग येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात भारतावर २७ धावांची नाममात्र आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या डावात २०२ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर आफ्रिकेने २२९ धावांपर्यंत मजल मारली. मोठी आघाडी घेण्याचं आफ्रिकेचं स्वप्न भारताच्या शार्दुल ठाकूरने उधळून लावलं. पालघरच्या शार्दुलने ७ विकेट घेत दुसऱ्या दिवशी आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडलं. पहिल्या दिवसाअखेरीस आफ्रिकेने १ विकेट गमावत […]
ADVERTISEMENT

जोहान्सबर्ग येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात भारतावर २७ धावांची नाममात्र आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या डावात २०२ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर आफ्रिकेने २२९ धावांपर्यंत मजल मारली. मोठी आघाडी घेण्याचं आफ्रिकेचं स्वप्न भारताच्या शार्दुल ठाकूरने उधळून लावलं. पालघरच्या शार्दुलने ७ विकेट घेत दुसऱ्या दिवशी आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडलं.
पहिल्या दिवसाअखेरीस आफ्रिकेने १ विकेट गमावत ३५ धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या दिवशी आफ्रिकन फलंदाज मोठी आघाडी घेण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरले खरे, परंतू शार्दुल ठाकूरने आपल्या गोलंदाजीत सुरेख मिश्रण करत आफ्रिकेच्या फलंदाजांना बॅकफूटला ढकललं. मोक्याच्या क्षणी आफ्रिकेच्या फलंदाजांची भागीदारी मोडून शार्दुलने भारताचं आव्हान या सामन्यात कायम राखलं.
दुसऱ्या दिवशी पिटरसन आणि एल्गर जोडीने खेळाला सावध पद्धतीने सुरुवात केली. शार्दुलने एल्गरला माघारी धाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. आफ्रिकेकडून केगन पिटरसन आणि टेंबा बावुमा यांनी भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत अर्धशतकी खेळी केली. या खेळीमुळेच आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात भारतावर आघाडी मिळवण्यात यशस्वी झाला. अखेरच्या फळीत मार्को जेन्सन आणि केशव महाराज यांनीही सुरेख फटकेबाजी करत संघाची बाजू वरचढ राखली.
शार्दुल ठाकूरची कसोटी क्रिकेटमधली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत दोन्हीमध्ये योगदान देण्याच्या उद्देशाने शार्दुलची संघात निवड झाली होती. फलंदाजीत शार्दुलला आपली चमक दाखवता आली नसली तरीही त्याने गोलंदाजीत आपली कामगिरी चोख बजावली. पहिल्या डावात भारताकडून शमीने दोन तर बुमराहने एक विकेट घेतली.