T20 World Cup 2021 साठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, कोणाची लागणार वर्णी?

T20 World Cup 2021Team india: टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची आज (8 सप्टेंबर) घोषणा करण्यात येणार आहे.
T20 World Cup 2021 साठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, कोणाची लागणार वर्णी?
T20 World Cup 2021 Team india(फाइल फोटो)

मुंबई: टी-20 वर्ल्ड कप 2021 साठी भारतीय संघाची बुधवारी (8 सप्टेंबर) घोषणा केली जाणार आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या बैठकीत टीम इंडियाची घोषणा केली जाईल. या दरम्यान, सिलेक्टर्स कर्णधार विराट कोहलीशी देखील चर्चा करतील. विराट या बैठकीला मँचेस्टरहून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहणार आहे. त्याचबरोबर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह (निवड समितीचे संयोजक) हे देखील या महत्त्वाच्या बैठकीचा भाग असतील.

टी-20 विश्वचषकात सहभागी होणाऱ्या सर्व संघांना 10 सप्टेंबरपर्यंत आपला संघ जाहीर करावा लागणार आहे. बीसीसीआय टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करणार आहे. याशिवाय, राखीव म्हणून पाच खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)ही फक्त 15 खेळाडूंचा खर्च उचलणार आहे. तर राखीव खेळाडूंचा खर्च संबंधित क्रिकेट बोर्डाला उचलावा लागणार आहे.

भारतीय संघात कोणाची वर्णी लागणार?

नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यावर युवा यष्टीरक्षक इशान किशनने भारतासाठी काही चांगली खेळी खेळली. अशा परिस्थितीत ईशान किशनला संजू सॅमसनपेक्षा प्राधान्य दिले जाऊ शकते. फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि राहुल चहर यांनाही संघात स्थान मिळवण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर अष्टपैलू हार्दिक पंड्याने अलीकडच्या काळात तितकी गोलंदाजी केलेली नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत सिलेक्टर शार्दुल ठाकूरच्या नावाचाही विचार करू शकतात. शार्दुलने इंग्लंडविरुद्धच्या ऐतिहासिक ओव्हल कसोटीत आपल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर भारताला दणदणीत विजय मिळवून दिला.

दरम्यान, मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर हा दुखापतीमुळे त्रस्त आहे. अशा स्थितीत सुंदरला टी-20 विश्वचषकासाठी संघात स्थान मिळणे कठीण वाटत आहे.

दुसरीकडे वेगवान गोलंदाजांमध्ये चेतन साकारिया आणि टी. नटराजन यांच्यापैकी कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नटराजन मागील काही दिवसात कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तर श्रीलंका दौऱ्यावर साकरिया हा भारतीय संघाचा एक भाग होता. त्यामुळे चेतन साकारियाची अतिरिक्त पाच जणांमध्ये नियुक्ती होऊ शकते.

टी-20 विश्वचषकात भारताला पाकिस्तान-न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानसह ग्रुप-2 मध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर ग्रुप-1 मध्ये वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. भारतीय संघ आपल्या सुपर 12 फेजची सुरुवात 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करणार आहे.

T20 World Cup 2021 Team india
T20 World Cup : जाणून घ्या स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक, भारताचे सामने कोणत्या दिवशी होणार?

T20 World Cup साठी भारताचा संभाव्य संघ -

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (wk), रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, दीपक चहर, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, ईशान किशन ( wk), भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in