Mumbai News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाशी मेट्रोने कनेक्ट होणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने या प्रकल्पाला मान्यता दिली असून त्यामुळे दोन्ही विमानतळांमधील प्रवास सुलभ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की दोन्ही विमानतळांमधील मेट्रो कनेक्शनसाठी अंदाजे 22,862 कोटी खर्च येईल. ही मेट्रो पीपीपी (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) मॉडेल वापरून विकसित केली जाणार असून या खर्चातील 20 टक्के भाग केंद्र सरकार, 20 टक्के राज्य सरकार आणि उर्वरित भाग पीपीपी ऑपरेटरचा असेल. हा प्रोजेक्ट साधारणपणे पाच वर्षांत पूर्ण करण्याचं नियोजन असलं तरी सरकारने तो तीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर कॅबिनेट पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) ओ.पी. गुप्ता, एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल गायकवाड, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी प्रकल्पाचं सादरीकरण केलं. बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, कोणत्याही पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन आणि सर्व प्रकारच्या परवानग्या प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण कराव्यात.
बैठक संपल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, मुंबई आणि नवी मुंबईतील विमानतळ थेट मेट्रोने जोडले जातील. 35 किमी लांबीची मेट्रो लाईन बांधली जाणार असून त्यामध्ये 9.25 किलोमीटर भूमिगत आणि 24.636 किमी एलिव्हेटेड रोडचा समावेश आहे. या मेट्रो मार्गावर एकूण 20 स्थानके असतील आणि त्यामध्ये 6 भूमिगत आणि 14 एलिव्हेटेड स्थानकांचा समावेश असेल.
हे ही वाचा: Govt Job: फ्रेशर्स उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी! BSNL मध्ये निघाली मोठी भरती...
कसा असेल मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-2 ते घाटकोपर (पूर्व) पर्यंत मेट्रो भूमिगत धावेल, तसेच घाटकोपर (पश्चिम) ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-2 पर्यंतचा मार्ग एलिव्हेटेड असेल. या दोन स्थानकांमधील सरासरी अंतर 1.9 किलोमीटर असेल. मेट्रोसाठी 30.7 हेक्टर जमीन संपादित करावी लागेल, ज्याची किंमत अंदाजे 388 कोटी असेल. ही मेट्रो लाइन कुर्ल्यातील लोकमान्य तिळक टर्मिनससह बऱ्याच महत्त्वापूर्ण रेल्वे स्थानकांना जोडेल. याव्यतिरिक्त, त्यात इतर तीन मेट्रो मार्गांसह एक इंटरचेंज देखील असेल, ज्यामुळे प्रवाशांना मोठी सुविधा मिळेल.
हे ही वाचा: पुणे: अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये "अजित सृष्टी" उभारणार! भाजप आमदार महेश लांडगे यांची मागणी
नाशिक रिंग रोडला मंजूरी
नागपूर-गोंदिया आणि भंडारा-गडचिरोली मार्गावरील समृद्धी एक्सप्रेसवेच्या विस्तारीकरणाचे काम जलदगतीने करण्याचे आणि प्रकल्पांना विलंब न करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. समितीने आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 3,954 कोटी रुपयांच्या 66.15 किमी लांबीच्या नाशिक सिटी रिंग रोड प्रकल्पालाही मान्यता दिली. खनिज वाहतूक सुलभ करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील 85.76 किमी लांबीच्या नवेगाव मोरे-कोणसरी-मुलचेरा-हाइड्री-सुरजगड महामार्गाचे चार पदरी काँक्रीट रस्त्यावर रूपांतर करण्यासही समितीने मान्यता दिली.
ADVERTISEMENT











