मुंबई: ठाण्यात कोकण नगर मंडळाने ठाण्याच्या संस्कृती दहीहंडीमध्ये 10 थर लावल्यानंतर घाटकोपरमधील मनसेच्या दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकाने देखील 10 थर रचले. त्यामुळे एकाच दिवसात दोन-दोन मंडळांनी विश्वविक्रम केला आहे.
ADVERTISEMENT
जय जवान पथकाची पार्श्वभूमी:
जय जवान गोविंदा पथक हे मुंबईतील जोगेश्वरी येथील एक प्रसिद्ध पथक आहे, ज्याला "उपनगरचा राजा" म्हणून ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हे पथक 9 थर रचून दहीहंडी उत्सवात आपले वर्चस्व प्रस्थापित करत आहे. यंदा त्यांनी 10 थर रचण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला होता, परंतु तो यशस्वी झाला नव्हता. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा 10 थर लावण्याचा प्रयत्न केला. जो यशस्वी झाला आणि कोकण नगर पाठोपाठ जय जवान गोविंदा मंडळाने देखील विश्वविक्रम रचला. 2024 साली जय जवान पथकाचा 10 थरांचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. पण यंदा मात्र त्यांना यामध्ये मोठं यश आलं आहे.
जय जवान आणि मनसेची दहीहंडी:
जय जवान पथकाने यापूर्वी मनसेच्या दहीहंडी उत्सवात 9 थर रचून यश मिळवले आहे. 2022 आणि 2023 मध्ये ठाणे आणि भांडुप येथील मनसेच्या दहीहंडीत त्यांनी 9 थर रचले होते. मात्र, यंदा घाटकोपरच्या मनसेच्या दहीहंडीत जय जवान पथकाने 10 थर रचून स्वत:चाच विक्रम मोडीत काढला आहे.
दहीहंडी उत्सव २०२५: कोकणनगर पथकाचा ऐतिहासिक विश्वविक्रम
दरम्यान, ठाण्यातील वर्तकनगर येथे संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित "संस्कृतीची दहीहंडी, विश्वविक्रमी दहीहंडी" या कार्यक्रमात जोगेश्वरीतील कोकणनगर गोविंदा पथकाने 10 थरांचा मानवी मनोरा रचून सर्वात प्रथम विश्वविक्रम नोंदवला. या यशस्वी प्रयत्नाने त्यांनी जोगेश्वरीच्याच जय जवान गोविंदा पथकाचा 9 थरांचा यापूर्वीचा विक्रम मोडला.
उत्सवाचे वातावरण
महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव हा गोकुळाष्टमीचा एक महत्त्वाचा भाग आहे. मुंबई आणि ठाण्यातील दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांमध्ये थर रचण्याची चढाओढ पाहायला मिळते. यंदा मुसळधार पावसातही गोविंदा पथकांचा उत्साह कायम होता. ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीत हजारो प्रेक्षक उपस्थित होते, ज्यांनी टाळ्यांच्या गजरात आणि घोषणाबाजीने या ऐतिहासिक क्षणाला दाद दिली
कोकणनगर पथकाची कामगिरी
कोकणनगर गोविंदा पथक हे जोगेश्वरीतील एक जुन्या आणि शिस्तबद्ध पथकांपैकी एक आहे. 38 वर्षीय प्रशिक्षक विवेक कोचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने गेल्या 12 वर्षांपासून सातत्याने थर रचण्याचा सराव केला आहे. 2012 मध्ये त्यांनी 7 थर रचण्यास सुरुवात केली, तर 2022 मध्ये त्यांनी 9 थर रचून विश्वविक्रमाची बरोबरी केली होती. यंदा, 10 थर रचून त्यांनी सर्वांना मागे टाकले.
या यशस्वी प्रयत्नासाठी कोकणनगर पथकाला २५ लाख रुपयांचे पारितोषिक संस्कृती युवा प्रतिष्ठानकडून जाहीर करण्यात आले. ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करत, आपला मुलगा पूर्वेश याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले.
ADVERTISEMENT
