Kalyan Accident : कल्याणच्या रिंग रोड परिसरात एका अल्पवयीन मुलाच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप आणि नामांकित उद्योजकाला आपला जीव गमवावा लागला आहे. प्रसिद्ध व्यावसायिक श्रीनिवास तंडाले हे सकाळी सायकलिंग करत असताना मागून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की तंडाले यांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक अपघाताचा सर्व थरार रस्त्याच्या कडेला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांची कडक कारवाई आणि पालकांवर गुन्हे
मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या 17 वर्षांच्या एका मुलाने घरातून कारची चावी नेली आणि तो रिंग रोडवर गाडी चालवू लागला. वेगावर नियंत्रण न राहिल्याने त्याने समोर असलेल्या तंडाले यांना धडक दिली. या घटनेनंतर खडकपाडा पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत कार जप्त केली आणि बुधवारी सकाळी 9 वाजता संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. केवळ मुलालाच नाही, तर अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी सोपवल्याबद्दल त्याची आई कामिनी योगेश पांडे हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, वडिलांवरही कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.
हेही वाचा : पाच दशके मराठ्यांच्या इतिहासाची सेवा करणारे डॉ. जयसिंगराव पवार काळाच्या पडद्याआड
रिंग रोडवरील सुरक्षेच्या प्रश्नावरुन नागरिकांचा संताप
हा अपघात कल्याणच्या चांदोरे परिसरातील रिंग रोडवर झाला, जो सध्या वेगवान आणि बेदरकार ड्रायव्हिंगमुळे अपघातांचा केंद्रबिंदू बनत चालला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या रस्त्यावर पूर्वी बॅरिकेड्स लावण्यात आले होते, परंतु काही दिवसांपूर्वी ते हटवण्यात आले. बॅरिकेड्स नसल्यामुळे वाहनांचा वेग प्रचंड वाढला असून मॉर्निंग वॉक आणि सायकलिंग करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावरील वाढती वाहतूक आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या भीषण घटनेचा निषेध करण्यासाठी आणि रस्त्यावरील सुरक्षेची मागणी करण्यासाठी स्थानिक सायकलिंग ग्रुप आणि नागरिक गुरुवारी एकत्र येऊन निदर्शने करणार आहेत. सायकलिंग ग्रुपच्या सदस्या डॉ. रहनुमा ऐत शमुद्दीन यांनी सांगितले की, अशा घटनांमुळे सकाळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या हातात गाडी देताना होणाऱ्या परिणामांचा विचार करणे गरजेचे आहे. हा अपघात केवळ एक रस्ते अपघात नसून पालकांच्या बेजबाबदारपणाचा परिणाम असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











