missing link tunnel landslide : मिसिंग लिंक प्रकल्पातील दरड कोसळण्याच्या घटनेनंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या तीन तरुणांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे. संदेश खरात, रोशन सरगर आणि अक्षय लांडगे हे तिघे सांगलीचे असून सध्या नवी मुंबईतील नेरूळ येथे वास्तव्यास आहेत. सांगलीहून मुंबईकडे येत असताना पहाटे सुमारे तीनच्या सुमारास ते मिसिंग लिंक बोगद्यात पोहोचले. बोगद्याच्या शेवटच्या टप्प्याजवळ पोहोचताच वरून पाणी आणि लहान दगड पडताना दिसू लागले. पुढे जाणे धोकादायक वाटल्याने त्यांनी गाडी थांबवली. काही वेळातच मोठा दगड आणि मातीचा ढिगारा रस्त्यावर कोसळल्याने संपूर्ण मार्ग बंद झाला. सुरुवातीला नेमके काय घडत आहे हे समजत नसल्याने बोगदाच कोसळत असल्याची भीती त्यांच्या मनात निर्माण झाली होती.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Personal Finance: दरमहा 2 हजार गुंतवा आणि 42 हजार परत मिळवा, लखपती बनण्याचा फॉर्म्युला!
एसओएस बटण दाबले अन् काही मिनिटांत टोईंग वाहन आले
घटना घडल्यानंतर त्यांनी तातडीने बोगद्यातील एसओएस बटण दाबले. त्यानंतर काही मिनिटांत टोईंग वाहन आल्याचे त्यांना दिसले आणि त्यामुळे आपला संदेश संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचल्याचा विश्वास त्यांना वाटला. त्याचबरोबर त्यांनी मागून येणाऱ्या वाहनांना हातवारे करून पुढे न जाण्याचा इशारा दिला. परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळाचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड केला, जेणेकरून पुण्याकडून येणाऱ्या इतर वाहनचालकांना आधीच सावध करता येईल. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अनेक प्रवाशांनी त्यांच्याशी संपर्क साधून रस्त्यावरील परिस्थिती आणि वाहतूक सुरू झाली का, याबाबत विचारणा केली.
हेही वाचा : आदित्य ठाकरे विधानसभेत चवताळून उठले.. पण तिथं आधी आणि नंतर घडलं तरी काय?, सगळंच प्रचंड इंटरेस्टिंग!
..तर वाहनांची एकमेकांवर धडक होऊन मोठा अनर्थ घडला असता
या संपूर्ण घटनेदरम्यान भीतीचे वातावरण होते, असे तिन्ही तरुणांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, मोठे दगड कोसळू लागल्यानंतर प्रत्येक क्षणी जीव धोक्यात असल्याची भावना होती. बोगद्यातील दिवे सुरू असल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली नाही, असेही त्यांनी नमूद केले. जर बोगद्यातील प्रकाशयोजना बंद झाली असती तर वाहनांची एकमेकांवर धडक होऊन मोठा अनर्थ घडला असता, अशी त्यांची भावना होती. त्या दिवशी त्यांच्या गाडीत कुटुंबातील सदस्य आणि एक लहान मूलही होते. लोनावळा परिसरात अनेक तास अडकून पडल्याने पाणी किंवा इतर कोणतीही सुविधा उपलब्ध झाली नसल्याचाही त्यांनी अनुभव सांगितला. सकाळ उजाडल्यानंतर आपण सुरक्षित ठिकाणी असल्याचे स्पष्ट झाल्यावरच त्यांच्या जीवात जीव आल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेनंतर विविध स्तरांवर त्यांच्या सतर्कतेचे कौतुक होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाकडून अद्याप कोणताही संपर्क झाला नसला तरी काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केल्याची माहिती त्यांनी दिली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बोगद्यात ठराविक अंतरावर कायमस्वरूपी कर्मचारी तैनात ठेवावेत, अशी त्यांनी मागणी केली. पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन तातडीने वाहतूक थांबविण्याची व्यवस्था अधिक सक्षम असावी, असेही त्यांनी मत व्यक्त केले. योग्य वेळी थांबण्याचा निर्णय, एसओएसद्वारे माहिती देणे आणि इतर वाहनांना सतर्क करण्याची कृती यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचा विश्वास या तिन्ही तरुणांनी व्यक्त केला.
ADVERTISEMENT












