Professor stabbed to death in Mumbai local : मुंबईची लोकल ट्रेन पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेमुळे चर्चेत आली आहे. मालाड रेल्वे स्थानकावर शनिवारी (दि.24) सायंकाळी लोकलमधील किरकोळ वादातून एका प्राध्यापकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली असून, रेल्वे पोलिसांनी जलद तपास करत अवघ्या 24 तासांत मुख्य आरोपीला अटक करण्यात यश मिळवलं आहे. आरोपीचे नाव ओंकार शिंदे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आलोक कुमार सिंह असं हत्या करण्यात आलेल्या प्राध्यापकाचं नाव आहे. दरम्यान, या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
अधिकची माहिती अशी की, बोरीवलीकडे जाणारी स्लो लोकल ट्रेन मालाड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत होती. त्यावेळी नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती. याच गर्दीतून लोकलमधून उतरत असताना आलोक कुमार सिंह (वय 33) हे दुसऱ्या प्रवाशाला धडकले. या धडकेतून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. वाद वाढत असतानाच आरोपी ओंकार शिंदे याने आपला राग अनावर करत अचानक धारदार शस्त्र काढलं. ट्रेन थांबताच आरोपीने आलोक सिंह यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला चाकूने वार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले आलोक सिंह प्लॅटफॉर्मवर कोसळले. क्षणार्धात संपूर्ण प्लॅटफॉर्मवर आरडाओरड आणि गोंधळ उडाला. प्रवाशांनी तातडीने रेल्वे पोलिसांना माहिती दिली. जीआरपीच्या जवानांनी जखमी अवस्थेतील आलोक सिंह यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र, जखम गंभीर असल्याने डॉक्टरांनी उपचार करूनही त्यांना वाचवू शकले नाही. उपचारादरम्यान आलोक सिंह यांचा मृत्यू झाला. आलोक सिंह हे एका खासगी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
घटनेनंतर आरोपी ओमकार शिंदे याने प्लॅटफॉर्मवरील गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे संपूर्ण रेल्वे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. दरम्यान, बोरीवली जीआरपीने तातडीने तपास सुरू केला. स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज, फुट ओव्हर ब्रिजवरील कॅमेरे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली होती.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे मालाड पूर्वेकडील कुरार गाव परिसरातून आरोपी ओंकार शिंदे याला 24 तासांच्या आत अटक केली. अटकेनंतर आरोपीला बोरीवली न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. लोकल ट्रेनमधील गर्दी, उतरण्याच्या घाईत होणारे वाद हे रोजचेच झाले आहेत. मात्र, अशा किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला होणं ही बाब गंभीर असून, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेने मुंबईकरांना हादरवून टाकलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
बार्शी : हॉस्टेलवर राहणारी मुलगी फोन उचलत नसल्याने आई रात्रभर चिंतेत, सकाळी आलेल्या बातमीने हळहळ
ADVERTISEMENT











