Mumbai Crime: नवी मुंबईतील पनवेल येथे असलेल्या एका फार्महाऊसच्या बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा आढळून आल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेतील आरोपी मॅनेजर हा महिला आणि मुलींचे वॉशरूममधील व्हिडिओ काढत असल्याचा आरोप करण्यात आल आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याच्याविरुद्ध पोक्सो तसेच बऱ्याच कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
फार्महाऊसच्या बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा
आरोपी मॅनेजरचं नाव मनोज चौधरी असून धनसागर गावात ‘रियांश फार्म हाऊस’ चालवतो. मनोज फार्महाऊसमध्ये येणाऱ्या महिलांचे प्रायव्हेट व्हिडिओ बनवायचा. एसीपी विक्रम कदम यांच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याच्या शेवटी पनवेलमधील रियांश फार्म हाऊसमध्ये एक कुटुंब राहण्यासाठी आलं होतं. रात्री जवळपास 2 वाजताच्या सुमारास, त्या कुटुंबातील एक महिला बाथरूममध्ये गेली आणि तिथे कोपऱ्यात एक लाईट जळत असल्याचं तिला दिसले. यावरून तिला संशय आला आणि जवळून तपास केल्यावर ती लाईट स्पाय कॅमेऱ्याची असल्याचं आढळून आलं.
महिलांचे प्रायव्हेट व्हिडिओ बनवायचा
यामुळे घाबरलेल्या महिलेने तातडीने फार्महाऊसचा मॅनेजर मनोज चौधरीला बोलवलं. जेव्हा पीडिता मॅनेजरच्या खोलीत पोहोचली तेव्हा तिला मनोज त्याच्या मोबाईलवर महिलांचे व्हिडिओ पाहत असल्याचं दिसून आलं. तिने जवळून पाहिल्यानंतर फोनवर तेच बाथरूममधील महिलांचे व्हिडिओ दिसले. यामुळे पीडितेला मोठा धक्का बसला. महिलेने लगेच तिच्या कुटुंबियांना संबंधित घटनेची माहिती दिली आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई करत आरोपी मनोज चौधरीला ताब्यात घेतलं आणि त्याचा मोबाईल फोन तपासला.
हे ही वाचा: अल्पवयीन विद्यार्थ्याचं अपहरण करण्याची धमकी आणि पैशांची मागणी... ठाण्यातील आरोपीला अटक
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईल फोनमधून जवळपास 17 व्हिडिओ जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने बरेच व्हिडिओ डिलीट केल्याची सुद्धा कबुली दिली. आता पोलिसांनी सायबर तज्ञांच्या मदतीने डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती आहे. आरोपीच्या फोनमधून अल्पवयीन मुलींचे व्हिडीओ सुद्धा आढळून आले आहेत.
हे ही वाचा: प्रियकराच्या प्रेमात पत्नी झाली बेवफा... दोन मुलांना सोडून गेली पळून अन् अॅडव्होकेट पतीने उचललं टोकाचं पाऊल!
पोलिसांचा तपास
त्यानंतर, या प्रकरणात POCSO कायद्यांतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता आयटी, POCSO आणि अश्लील कंटेंट प्रसारित करण्याशी संबंधित कलमांखाली आरोपींची चौकशी करत आहेत. आरोपी मनोज चौधरीला पनवेल न्यायालयात हजर करण्यात आलं असून तिथून त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस याबाबतीत माहिती देताना म्हणाले की, “आम्ही संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहोत. या घृणास्पद कृत्यात इतर कोणी व्यक्ती किंवा टोळी सहभागी आहेत का? याचा सुद्धा आम्ही तपास करत आहोत. सायबर सेलच्या मदतीने सर्व डेटा आणि उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे."
ADVERTISEMENT











