Pune Accident : पुण्यात गुन्हेगारीसह वाहतुकीचा बेशिस्तपणा समोर आलेला दिसून येत आहे. याच पुणे शहरात मोठ्या प्रमाणात भीषण अपघाताच्या घटनाही प्रकर्षाने समोर येऊ लागल्या आहेत. कोरेगाव पार्कात पहाटेच्या सुमारास बंडगार्डन मेट्रो स्थानकाजवळ भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. यश प्रसाद भंडारी (वय 23) आणि ऋत्विक ऊर्फ ओम विनायक भंडारी (वय 23) असे अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. तसेच अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव खुशवंत टेकवणी असे आहे.
ADVERTISEMENT
दोन चुलत भावांचा अपघातात मृत्यू
एका काळ्या रंगाच्या पोलो कारला (H 14 DT 8292) धडक दिल्याने हा अपघात झाला होता. अपघातात मृत झालेले दोन तरुण हे चुलत भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच जखमी रुग्ण खुशवंत टेकवणी याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनं पुन्हा एकदा पुणे हादरून गेलं आहे.
अपघातात कारचा चेंदामेंदा
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कार अतिवेगाने आली आणि चालकाचा ताबा सुटल्याने ती रस्त्यालाच आदळल्याचे चित्र आहे. धडक इतकी जोराची होती की, कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आणि त्याचक्षणी स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने मदकार्य सुरु केले.
या घटनेदरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बंडनगार्डन पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली वेगावरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ADVERTISEMENT











