Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका जन्मदात्या बापानेच स्वतःच्या दोन निष्पाप मुलांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. मोशी येथील रहिवासी असलेल्या सागर सदाशिव शिंदे या 29 वर्षीय नराधम पित्याने आपल्या दोन चिमुकल्यांना फिरायला नेण्याच्या बहाण्याने घराबाहेर नेले आणि त्यांचे आयुष्य संपवण्याचा क्रूर प्रयत्न केला. या अमानुष कृत्यामध्ये साडेतीन वर्षांच्या हर्षदा शिंदे या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर पाच वर्षांचा मुलगा सुदैवाने या मृत्यूच्या विळख्यातून बचावला आहे. या घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवून आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : नागपूर : कॉलेजमधील वासनांध तरुण, सावत्र आईच्या बेडरुममध्ये जायचा; प्रेग्नंट राहिली अन्...
जंगलात मुलांचा गळा आवळला; चिमुकल्या आर्यनच्या जिद्दीमुळे फुटले बिंग
आरोपी सागर शिंदे याने मंगळवारी सकाळी मुलांना बाहेर फिरवून आणतो असे सांगून घराबाहेर नेले आणि तो पुणे-नाशिक महामार्गाने जुन्नर तालुक्यातील आळेखिंड जंगल परिसरात पोहोचला. या निर्जन ठिकाणी त्याने आपल्या दोन्ही मुलांचा अत्यंत निर्घृणपणे गळा दाबला आणि त्यांना मृत समजून जंगलात फेकून दिले. मात्र, बुधवारी सकाळी पाच वर्षांचा आर्यन शुद्धीवर आला आणि रडत रडत रस्त्यापर्यंत पोहोचला. रस्त्यावरून जाणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांनी त्या रडणाऱ्या मुलाला पाहिले आणि तात्काळ मदत करत पोलिसांच्या स्वाधीन केले. आर्यनने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली आणि एका मोठ्या गुन्ह्याचा उलगडा झाला.
हेही वाचा : होणाऱ्या नवऱ्यासमोर तरुणीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी रगेल आरोपीच्या थेट पायावरच झाडल्या गोळ्या!
चाकणमधून आरोपी पिता ताब्यात; पोलिसांनी शोधमोहीम राबवून शोधला मृतदेह
आर्यनने सांगितलेल्या माहितीच्या आधारे आळेफाटा पोलिसांनी तातडीने नातेवाईकांशी संपर्क साधला आणि आरोपी सागर शिंदेचा शोध सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला चाकण परिसरातून ताब्यात घेतले. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या सागरने पोलिसी खाक्या दाखवताच आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर आळेफाटा पोलिसांनी त्याला घेऊन आळेखिंड जंगल परिसरात शोधमोहीम राबवली. दुर्दैवाने, ज्या ठिकाणी त्याने मुलांना फेकले होते, तिथे साडेतीन वर्षांच्या हर्षदाचा मृतदेह आढळून आला. स्वतःच्या हाताने आपल्या फुलासारख्या लेकरांचा गळा आवळणाऱ्या या बापाची क्रूरता पाहून पोलीस अधिकारीही थक्क झाले आहेत.
पोलिसांकडून गुन्हा दाखल; संपूर्ण तालुक्यात हळहळ
आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कौटुंबिक किंवा अन्य कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. हर्षदाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून आरोपीवर हत्येचा आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचा अशा प्रकारे अंत झाल्याने आणि पाच वर्षांच्या मुलाने जो भयानक अनुभव घेतला, ते ऐकून जुन्नर तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करत असून या प्रकरणातील सर्व दुवे जोडण्याचे काम सुरू आहे.
ADVERTISEMENT











