Pune Municipal corporation News : पुणे महानगरपालिकेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कोट्यवधी रुपयांचा मिळकत कर कमी करण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्याच डोक्याला पिस्टल लावून महापालिका अधिकाऱ्यांना धमकावले. काल (13 फेब्रुवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करत त्या व्यक्तीचा शस्त्र परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : केरळची सर्वात लहान organ donor; 10 महिन्यांची चिमुकली 5 जणांचा जीव वाचवणार!
नेमकं काय घडलं?
पुणे महानगरपालिका भवनाच्या मिळकत कर विभागात हा धक्कादायक प्रकार घडला. काल सायंकाळी पाचच्या सुमारास एका व्यावसायिकाने व्यावसायिक वापराच्या इमारतीचा कोट्यवधी रुपयांचा मिळकत कर कमी करण्याची विनंती केली. परंतु संबंधित अधिकाऱ्याने मिळकत कर कमी करण्यास नकार दर्शवला. यानंतर व्यावसायिकाने स्वतःच्याच कमरेला असलेले पिस्टल डोक्याला लावून मिळकत कर कमी करा अशी धमकी दिली. या धक्कादायक प्रकारामुळे मिळकत कर विभागात एकच खळबळ उडाली. सुरक्षारक्षकांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्याला कळविले.
कोण आहे आरोपी?
आरोपीचे नाव महेंद्र लोणकर (रा.वानवडी) असे आहे. लोणकर याच्या विरोधात कर आकारणी विभाग कर्मचारी कपिल ताथवाडे यांच्याकडून तक्रार दाखल करायचे काम चालू आहे. आरोपीला शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
काय म्हणाले महापालिका आयुक्त?
या संदर्भात महानगरपालिकेच्या आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, 'संबंधित व्यक्तीला मिळकत कर कमी करण्यासंदर्भात आम्ही योग्य ती मदत करत होतो. परंतु आज जो काही त्यांनी डोक्याला पिस्टल लावून धमकवण्याचा प्रयत्न केला याची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्याकडील शस्त्राचा परवाना रद्द करण्याची देखील शिफारस आम्ही करणार आहोत.'
ADVERTISEMENT











