डोंबिवली: डोंबिवली सर्पदंश झालेल्या दोन्ही रूग्ण मुलींवर उपचार करण्यात हेळसांड केल्याचा आरोप करत मंगळवारी विविध नेत्या/पुढाऱ्यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयावर खळ खट्याक् आंदोलन करून निषेध व्यक्त केला. प्रशासनाने चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसह बळीचा बकरा केलेल्या डॉ. संजय जाधव यांचे निलंबन रद्द करण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी या पार्श्वभूमीवर केली आहे.
ADVERTISEMENT
खंबाळपाड्यात रविवारी 28 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास 4 वर्षीय प्राणवी भोईर आणि तिची 24 वर्षीय मावशी बबली उर्फ श्रुती ठाकूर जिचं नुकतंच लग्नही ठरलं होतं. या दोघींना गाढ झोपेत असताना मण्यार जातीच्या सापाने दंश केला. या दोघींना उपचाराकरिता शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दोन्ही निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाचा बेपर्वा कारभार कारणीभूत असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नेत्या/पुढाऱ्यांनी दुर्दैवी मुलींच्या पालकांसह शास्त्रीनगर रूग्णालयात घुसून एल्गार केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
◆ योगायोगाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला 2 ऑक्टोबर रोजी 42 वर्षे पूर्ण झाली आहेत. मागील 42 वर्षांत ही महानगरपालिका एकही सुसज्ज आरोग्य व्यवस्था असलेले रूग्णालय उभी करू शकली नाही. परिणामी सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. असलेल्या एकाही रूग्णालयात अत्यावश्यक सेवा उपलब्ध नाही. साडेतीन हजार कोटींचे बजेट असलेल्या महानगरपालिकेच्या रूग्णालयांत आयसीयू, मोफत सिटीस्कॅन, एमआरआय, रक्त व इतर तपासणी सारख्या सुविधा उपलब्ध नाहीत. कल्याण-डोंबिवलीत आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे सर्पदंश झालेल्या 4 वर्षीय प्राणवी भोईर आणि तिची 23 वर्षीय मावशी बबली उर्फ श्रुती ठाकूर या दोघींचा योग्य उपचारांअभावी मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा>> डोंबिवली हादरलं! तीन वर्षाच्या चिमुरडीसह मावशीला सर्पदंश, विवाहाची ठरली होती तारीख, नंतर रुग्णालयात जाताच...
या घटनेला सर्वस्वी आरोग्य विभागातील अधिकारी जबाबदार आहेत. या पूर्वीही अनेक रूग्णांचा उपचारांअभावी मृत्यू झाला आहे. त्यामुळे आणखी किती बळी जाण्याची महानगरपालिका वाट पाहणार? असा सवाल उपस्थित करत आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त प्रसाद बोरकर यांची भेट घेऊन निवेदनामार्फत भावना व्यक्त केल्या.
या दोघींच्या मृत्यूला कारणीभूत ठरवत संबंध नसलेल्या त्वचारोग तज्ज्ञ डॉ. संजय जाधव यांचा हकनाक बळी घेतला आहे. दररोज जवळपास अडीचशे रूग्णांची तपासणी करणाऱ्या कर्तव्यदक्ष डॉ. संजय जाधव यांचे निलंबन रद्द करून त्यांना याच रूग्णालयाचे मुख्य वैद्यकिय अधिकारी म्हणून पदोन्नती द्यावी, या मागणीकडे आंदोलनकर्त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. तत्पूर्वी आंदोलनकर्त्यांनी या साऱ्या घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकाळपासून रस्त्यावर उतरून भीक मांगो आंदोलन केले.
◆ आंदोलनकर्त्यांच्या मागण्या...
1) कल्याणच्या रूक्मिणीबाई आणि डोंबिवलीच्या शास्त्रीनगर या दोन्ही रूग्णालयांतील आयसीयू विभाग अद्यावत व सुसज्ज बनवावेत
2) वैद्यकीय विभागावर प्रशासकीय काळामध्ये काम सुरळीत व चोख रहावे म्हणून पर्यवेक्षणाकरिता आयुक्तांच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी.
3) गर्भवती महिलांचे उपचारादरम्यान मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ते रोखण्याकरिता कृती योजना तयार करण्यात यावी व त्यावर तत्काळ अंबालबाजवणी व्हावी.
4) सर्पदंश झालेल्या दोन्ही निष्पाप मुलींच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपा शुक्ला आणि शास्त्रीनगरचे डॉ. योगेश चौधरी हे देखील तितकेच जबाबदार आहेत. या विभागाचे प्रमुख म्हणून त्यांचे तातडीचे निलंबन करण्यात यावे, जेणेकरून यापुढे आपल्या कामात कोणताही अधिकारी कसूर करणार नाही.
◆ या चार कलमी मागण्यांचे स्वरूप हे जनतेच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्याचे काटेकोरपणे अवलोकन होणे अपेक्षित आहे. येत्या एक महिन्यात या सर्व मागण्यांची अंबालबाजवणी न झाल्यास संपूर्ण जनता विराट मोर्चा घेऊन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर धडकल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या निवेदनातून दिला आहे.
◆ प्रशासनाचे आश्वासन...
आंदोलनकर्त्यांमध्ये दिपेश म्हात्रे, भालचंद्र तथा भाऊ पाटील, संतोष केणे, सत्यवान म्हात्रे, प्रकाश भोईर, राहूल कामत, अरूण जांभळे, सरोज भोईर, राहूल भोईर तसेच मृतकांचे नातेवाईक आदींचा समावेश होता. यावेळी आंदोलनकर्त्यांना केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांच्यावतीने अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी लेखी आश्वासन दिले. प्राणवी भोईर आणि श्रुती ठाकूर या सर्पदंश झालेल्या दोन्ही रूग्णांवर योग्य उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. दोन्ही रूग्णांच्या दुःखद निधनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आश्र्वासित करण्यात येते की. सदर प्रकरणाची सीसीटिव्ही, उपचार रजिस्टरर्स व संबंधितांचे जबाब घेऊन निःपक्षपाती सखोल चौकशी करून सदर घटनेमध्ये दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी लेखी आश्वासनात म्हटले आहे.
ADVERTISEMENT
