मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’च्या दुसऱ्या पर्वातून दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे याला डच्चू देण्यात आला आहे. त्याऐवजी अभिनेता अभिजीत खांडकेकर याला सूत्रसंचालनाची जबाबदारी देण्यात आली आहे. या निर्णयानंतर अनेक प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण याच पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी निलेश साबळे यांच्या डोक्यात हवा गेली होती.. असं विधान करत त्यांना आलेल्या अनुभवाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
शरद उपाध्ये यांची पोस्ट जशीच्या तशी...
आदरणीय नीलेशजी साबळे,
आपल्याला हवा येऊ द्याच्या दुसऱ्या पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजीत खांडकेकरना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली. वाईट वाटले पण आश्चर्य नाही. मला तुम्ही एकदा बोलवले होते. त्याप्रमाणे मी ११ वा. पोहोचलो. पण ३ वाजेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते पण एकादोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत.
मला रुम सोडू नका असे सांगीतले होते. नीलेश तुम्ही इतर कलावंतांच्या रुममध्ये जाऊन गप्पा मारीत होतात पण माझ्या रुममध्ये डोकावलात ते थेट ४ वा. स्माईलही न देता स्टेजवर गेलात. इतरांचे शूटिंग खूप वेळ केलेत पण मला ६ वा. बोलावून घाईघाईत १५ मिनिटात सारे आटोपले.
त्यावेळीही इतर कलावंत मधेमधे बोलत होते. माझा सारा दिवस फुकट गेला. एडिटींगमध्येही माझी उत्तरे गाळलीत. बाहेर आपली भेट झाली तेंव्हा वडीलांच्या नात्याने काही सल्ले दिले. पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती.
दुसऱ्याच्या विषयाबद्दल आदर ठेवायचा असतो पण तुम्ही बेपर्वा होतात. त्याच वेळी मला वाटले की अहंकार अति वाईट. गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते. एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो.
स्टेजवर तुम्ही साऱ्यांना आपलेसे केले नाही.आपले सादरीकरणही आकर्षक होत नव्हते. या साऱ्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनेलने बाहेर काढले. नीलेशजी स्वभाव मनमिळाऊ असावा साऱ्यांना सांभाळून घ्यावे मग सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल.
अभिजीत खांडकेकर ही धुरा चांगली सांभाळतील. मला त्यांचा सहवास मिळाला आहे. आपण अनुभवी आहात. त्यांना मार्गदर्शन करा. इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा. आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती.
अशी पोस्ट लिहित शरद उपाध्ये यांनी निलेश साबळेला खडे बोल सुनावले आहेत. शरद उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये निलेश साबळेबाबत नाराजी व्यक्त करताना त्याच्या वागणुकीवर आणि व्यावसायिक दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
हे ही वाचा>> Hotel Bhagyashree: 'नाद करती काय..' हॉटेल भाग्यश्री आता भलत्याच गोष्टीमुळे चर्चेत!
निलेश साबळेला का देण्यात आला डच्चू?
‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम 18 ऑगस्ट 2014 रोजी सुरू झाला आणि गेल्या 10 वर्षांत त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवले. निलेश साबळेने या शोचे दिग्दर्शन आणि सूत्रसंचालन करताना भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे यांच्यासह एक मजबूत टीम तयार केली होती. मात्र, गेल्या वर्षी हा शो बंद झाल्यानंतर निलेश साबळेने कलर्स मराठीवरील ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!!’ या नव्या शोमध्ये प्रवेश केला, परंतु तो शो फार काळ टिकला नाही.
हे ही वाचा>> Shefali Jariwala: 'तिच्यासमोरच' त्याने केलेली मृत्यूची भविष्यवाणी, 'तो' Video प्रचंड व्हायरल!
आता ‘चला हवा येऊ द्या’च्या दुसऱ्या पर्वात निलेश साबळे, भाऊ कदम आणि सागर कारंडे यांची अनुपस्थिती प्रेक्षकांना खटकणार आहे. कारण नव्या प्रोमोमध्ये गौरव मोरे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके आणि भारत गणेशपुरे यांच्यासह नव्या कलाकारांचा समावेश आहे, परंतु निलेश साबळेच्या जागी अभिजीत खांडकेकरला चॅनलने आणलं आहे.
दरम्यान, शरद उपाध्ये यांच्या पोस्टनंतर निलेश साबळेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेले नाही. तसंच शोमधून काढण्यात आल्याच्या निर्णयावर देखील काहीही भाष्य केलेलं नाही.
ADVERTISEMENT
