Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि. 11) सायंकाळी कंदुरीच्या कार्यक्रमात किरकोळ वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाले. चांदा गाव शिवारात झालेल्या या घटनेत शाहिद राजमोहम्मद शेख (वय 23, रा. चांदा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) या तरुणावर गोळीबार करण्यात आला असून त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चांदा गाव शिवारात आरोपी सुरज लतीफ शेख (वय 23, रा. चांदा) यांच्या शेतात कंदुरीचा म्हणजेच जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मृत शाहिद शेख हा बोकड कापण्यासाठी गेला होता. कार्यक्रमस्थळी त्याची मित्रमंडळीही उपस्थित होती. सायंकाळी सुमारे 4.45 ते 5.00 वाजण्याच्या सुमारास शाहिद शेख, आरोपी सुरज लतीफ शेख तसेच अक्षय जाधव यांच्यात कोणत्या तरी किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर परिस्थिती चिघळली. या वादातून आरोपींनी बंदुक काढून शाहिद शेख याच्यावर गोळीबार केला. गोळ्या लागल्याने शाहिद गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कंदुरीच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
घटनेची माहिती मिळताच शाहिदला रात्री उपचारासाठी नगरला आणले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संभाजी नगरला पीएम साठी घेऊन गेले आहेत गुन्हा दाखल करायचे काम सुरू आहे. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. प्राथमिक तपासात हा खून किरकोळ वादातून झाल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, नेमका वाद कशावरून झाला आणि गोळीबारासाठी वापरलेले शस्त्र कुठून आणले, याचा तपास पोलीस करत आहेत. चांदा-शनिशिंगणापूर रोडवरील शेख वस्ती परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अहिल्यानगरमध्ये अशा प्रकारे झालेल्या गोळीबाराने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी लवकरच आरोपींना ताब्यात घेऊ, असा विश्वास व्यक्त केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











