Ahilyanagar News Saundala village : अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीने जातमुक्त गावाची घोषणा केली आहे.. आमच्या गावात जातींवरुन भेद केला जाणार नाही, आंतरजातीय विवाह थाटात लावले जातील, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरील संदेशांना गावकरी थारा देणार नाहीत, असा ठरावच सौंदाळा ग्रामस्थांनी एकमुखाने संमत केलाय.. दरम्यान, याशिवाय जातमुक्तीसाठी आणखी कोण-कोणते निर्णय ग्रामस्थांनी एकमताने मंजूर केले आहेत? सरपंचांना याबाबत काय वाटतं? ते जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
नेवासा तालुक्यातील सौंदाळा गाव नेहमी समाज हिताचे निर्णय घेत असते.. त्यामध्ये शिवी बंदी, विधवा पुनर्विवाह, विद्यार्थी आणि गावाच्या हिताचे वेगवेगळे ठराव सौंदाळा ग्रामपंचायत मार्फत आजवर घेतले गेले आहेत.. याच सौंदाळा गावाने आता जात हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.. सरपंच शरद आरगडे यांनी ग्रामसभेत जातमुक्त गावचा ठराव मांडला आणि संपूर्ण गावाने या ठरावाला एकमुखी पाठिंबा दिला.. या ठरावानुसार सौंदाळा गावामध्ये यापुढे आंतरजातीय विवाह केले जातील.. जात, पंथ, धर्म, वंशाच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही.. गावातील सर्व नागरिक समान असून, 'माझी जात-मानव' ही भावना स्वीकारण्यात येत आहे.. सार्वजनिक ठिकाणे, शासकीय योजना, ग्रामपंचायत सेवा, सामाजिक-धार्मिक कार्यक्रम, विवाह, सण-उत्सवात जातिभेद केला जाणार नाही...गावातील कुणीही सोशल मीडियावर जातिभेद करणारे मेसेज करणार नाही आणि तसे आढळल्यास ठरावानुसार संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे..
सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे याबाबत बोलताना म्हणाले, "आम्ही ग्रामसभेत जातमुक्त गावाची घोषणा केलीये. ग्रामसभेमध्ये सर्वानुमते हा ठराव मंजूर झालाय. शाळेत प्रत्येकाने भारत माझा देश आहे, आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञा म्हटलेली आहे. मात्र, आता दैनंदिन जीवनात पाहिलं तर प्रत्येक जाती-पातीत वाटल्या गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय. जातीभेद सुरु झालाय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मानव जात ही खरी जात आहे. जरी समाज आरक्षण वगैरे काही विषय असतील, तरी जात कागदापुरती मर्यादित असावी. ती माणुसकीमध्ये नसावी. दैनंदिन जीवन जगताना कुठेही जातीची गरज भासत नाही. एखाद्यावर संकट येतं, तेव्हा कोण कोणाची जात पाहात नाही. अशी परिस्थिती असताना कुठेतरी निवडणूक लागली की जात दिसते. अशा गोष्टी लक्षात येतात तेव्हा वाटतं, उपचारापेक्षा प्रतिबंध बरा. गावप्रमुख म्हणून आपली ती जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही आधी ग्रामस्थांची चर्चा केली. ग्रामसभेत हाच विषय ठेवला होता.
नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठल लंघे याबाबत बोलताना म्हणाले, संपूर्ण राज्याला दिशादर्शक असा निर्णय नेवासा तालुक्यातील आमच्या सौंदाळा ग्रामपंचायतीने घेतलाय. जातमुक्त गाव आम्हाला करायचं आहे. पूर्वीच्या रुढी-परंपरा चालत आल्या होत्या. नवीन पिढीने त्याला फाटा दिलेलाच आहे. सर्वांनी एकत्र येऊन प्रगतीकडे जावं, यासाठी हे घेतलेले निर्णय आहेत. सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, हीच भावना आहे.
जात नष्ट झाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं, मात्र जात नाही ती जात हे भारतीय समाज व्यवस्थेचे कटू सत्य आहे.. जात निर्मूलनासाठी सौंदाळा ग्रामपंचायतने टाकलेले हे पाऊल निश्चितच पथदर्शी म्हणावे लागेल...
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











