महाबळेश्वर, इम्तियाज मुजावर : पोलादपूर-आंबेनळी घाट मार्गावर रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. एमएच 11 डीएन 2340 क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी सुमारे 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की गाडीचा पूर्ण चुराडा झाला असून गाडीत प्रवास करणाऱ्या सर्वांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT
स्कॉर्पिओ थेट खोल दरीत कोसळली
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास आंबेनळी घाट परिसरात झाला. घाटातील तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर स्कॉर्पिओ थेट खोल दरीत कोसळली. रात्रीचा अंधार आणि दुर्गम घाट परिसरामुळे बचावकार्यात सुरुवातीला मोठ्या अडचणी निर्माण झाल्या.
हेही वाचा : पोलिसाच्या पत्नीने बहिणीला मोबाईलचा पासवर्ड पाठवला, अन् पुढे सर्वांची झोप उडाली
अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स, स्थानिक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाला दरीत उतरून मदतकार्य करावे लागले. सुमारे 800 फूट खोल दरी आणि दाट जंगलामुळे रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून चार स्वतंत्र बचाव पथके युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत.
या अपघातात आसगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा येथील महेश अनिल पवार (वय 25), आदित्य अशोक साळुंखे (21), रितेश राजेंद्र लोखंडे (25), सुहास जितेंद्र लोखंडे (20), अंश समीर चव्हाण (18), उत्कर्ष आनंद शिंगटे (21), अनिल अभिमन्यू शिंगटे (25) आणि नितीन किसन नायकोंडे (35) यांचा मृत्यू झाला आहे. मृत सर्व युवक एकाच परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनास्थळावरून आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरित मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस आणि प्रशासनाने परिसरात बंदोबस्त वाढवला असून स्थानिक नागरिकही बचावकार्यात मदत करत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार अतिवेग, घाटातील धोकादायक वळण अथवा चालकाला डुलकी लागणे या शक्यतांवर पोलीस तपास करत आहेत. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण कोरेगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











