Thane Case : ठाण्यातील जुपिटर हॉस्पिटलसमोर एका कॅब चालकाने वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. सरोश दस्तूर असे या मारहाण झालेल्या वयोवृद्ध व्यक्तीचे नाव असून, त्यांनी कॅब चालकाला रस्त्यावर थुंकल्याचा जाब विचारला होता. याचा राग अनावर झाल्याने परप्रांतीय टॅक्सी चालक निशांत धर शुक्ला याने दस्तूर यांना जबर धक्काबुक्की केली आणि फुटपाथवर ढकलून दिले. या मारहाणीत दस्तूर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्या पत्नीच्या समोरच हा सर्व प्रकार घडला असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
ADVERTISEMENT
आरोपीला अटक
या घटनेची भीषणता पाहता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांना फोन करून या प्रकरणात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. "वृद्धाचा पाय फ्रॅक्चर केला आहे, त्यामुळे आरोपीवर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करा," अशा कडक सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सुरुवातीला मारहाण झालेले वयोवृद्ध दांपत्य प्रचंड घाबरल्यामुळे स्वतःहून तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. अशा परिस्थितीत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्या मुजोर चालकाचा शोध घेतला आणि त्याला चांगलाच चोप देऊन वर्तक नगर पोलिसांच्या ताब्यात दिले. अखेर 14 तासांच्या प्रतीक्षेनंतर, शिवसेना कार्यकर्ते नितेश पाटोळे यांनी स्वतः या प्रकरणात फिर्यादी बनून पोलिसात रीतसर गुन्हा दाखल केला, ज्यावरून आरोपी निशांत धर शुक्ला याला अटक करण्यात आली.
हे ही वाचा : बदलापूर : 'माझी आई मेली..' चार वर्षांच्या मुलासमोर कारमध्ये काय घडलं?
राज ठाकरेंची एंट्री
या संवेदनशील प्रकरणात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही एंट्री झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट पीडित वृद्ध सरोश दस्तूर यांच्या पत्नीला फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी दस्तूर यांच्या पत्नीने राज ठाकरे यांचे आभार मानत, सध्या त्यांचे पूर्ण लक्ष पतीच्या शस्त्रक्रियेवर आणि रिकव्हरीवर असल्याचे सांगितले. राज ठाकरेंनी त्यांना धीर देत, "काळजी घ्या आणि काहीही मदत लागली तर नक्की सांगा," असे आश्वासन दिले. राज ठाकरेंसोबत झालेल्या या संभाषणामुळे पीडित कुटुंबाला मोठा मानसिक आधार मिळाला आहे.
हे ही वाचा : गर्लफ्रेंडच्या नादात वेडा झाला, पोटच्या जुळ्या मुलींसह आणखी एका लेकीसोबत क्रूर कृत्य
मदतीचे आश्वासन
राज ठाकरेंपाठोपाठ खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील सरोज दस्तूर आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यांनी दस्तूर यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी करत त्यांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय आणि कायदेशीर मदतीचे आश्वासन दिले आहे. एका ज्येष्ठ नागरिकाने केवळ स्वच्छतेसाठी आणि कचरा टाकण्यावरून जाब विचारला म्हणून त्याला अशा प्रकारे अमानुष मारहाण केली गेल्याने ठाण्यात सध्या या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
ADVERTISEMENT











