मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आज (18 ऑगस्ट 2025) एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) उद्या, (मंगळवार 19 ऑगस्ट 2025) रोजी मुंबई महानगर क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिल्यामुळे सर्व शासकीय, खासगी, आणि महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. याशिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रशासनाने याच स्वरूपाचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT
आज दिवसभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय प्रशासनाने आधीच जाहीर केला आहे. या निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा>> मुंबईकरांनो सावधान, उद्याही कोसळणार प्रचंड पाऊस.. Red अलर्ट जारी, 'यामुळे' मुंबईत बरसतोय अतिमुसळधार पाऊस
निर्णयाची पार्श्वभूमी
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, उद्या मुंबईत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रेड अलर्ट म्हणजे प्रचंड पाऊस आणि त्यासोबतच पूर, वाहतूक कोंडी, आणि इतर आपत्तींची शक्यता असते. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बीएमसीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाराखाली हा निर्णय घेतला आहे. या सुटीचा फायदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि पावसामुळे होणाऱ्या संकटांना प्रतिबंध करण्यासाठी केला जाणार आहे.
अधिकृत घोषणा
बीएमसीच्या अधिकृत ट्विटर हँडल @mybmc वरून ही माहिती देण्यात आली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये यांना उद्या दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी! भारतीय हवामान खात्याने उद्या मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई महानगरात अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर क्षेत्रातील (मुंबई शहर आणि उपनगरे) सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये यांना सुटी जाहीर करण्यात येत आहे."
हे ही वाचा>> मुंबईत पावसाचा धुमाकूळ, दुपारच्या शाळा, कॉलेजला सुट्टी; पाहा कुठे-कुठे साचलंय पाणी
या निर्णयानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नागरिकांनी हा निर्णय स्वागतार्ह मानला आहे, तर काहींनी पावसाच्या अंदाजाबाबत शंका उपस्थित केली आहे.
ठाणे, पालघर जिल्ह्यातही सुट्टी जाहीर
मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात देखील आज दिवसभर संततधार पाऊस सुरू आहे. तसंच या दोन्ही जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळेच या दोन्ही जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पाऊस सुरू असून, आज सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत चेंबूर येथे 140.80 मिमी पाऊस नोंदवला गेला आहे, ज्यामुळे पाणी तुंबणे आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे.
नागरिकांना सूचना
बीएमसीने मुंबईकरांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः पावसामुळे रस्ते बंद होण्याची शक्यता असल्याने, आवश्यक नसल्यास घरातच थांबावे, अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत 1916 या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
