मुंबई: मुंबईतील खार पश्चिम परिसरात भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत 41 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी जखमी झाली आहे. याच अपघातात एका स्कूटीस्वारालाही दुखापत झाली असून त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. 28 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी सी.डी. रोड आणि 16व्या रोड जंक्शन परिसरात हा अपघात झाला.
ADVERTISEMENT
खार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, इयप्पन सेल्वराज (41) हे पत्नी नॅन्सी इयप्पन (37) यांच्यासोबत मोटरसायकलवरून वांद्रेच्या दिशेने जात होते. त्यांची मोटरसायकल क्रमांक MH-02-FZ-1444 असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मागून कारने दिली जोरदार धडक
सायंकाळी सुमारे 4.15 ते 4.30 वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या मोटरसायकलला मागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारने जोरदार धडक दिल्याचा आरोप आहे. कारचा क्रमांक MH-01-ER-2822 असून, धडकेनंतर नॅन्सी रस्त्यावर पडल्या, तर त्यांचे पती इयप्पन हे कारखाली अडकल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हे ही वाचा>> मुंबई : सार्वजनिक शौचालयात घडलं भयंकर, दोन तरुणांचा मृत्यू, 'तो' वायू नेमका आला कुठून?
इयप्पन यांनी हेल्मेट घातले होते, अशीही माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत कार उचलून इयप्पन यांना बाहेर काढले.
डोक्यासह शरीरावर गंभीर दुखापत
अपघातात इयप्पन यांच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या कानाजवळूनही रक्तस्राव होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. नॅन्सी यांच्या हातालाही दुखापत झाली.
हे ही वाचा>> पुणे हादरलं, पाकिस्तानी ब्यूटी क्रीम चक्क पुणेकरांच्या हाती आली अन्...
दोघांना नागरिकांनी ऑटो रिक्षातून भाभा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी इयप्पन सेल्वराज यांना मृत घोषित केले.
कारचालकाची ओळख समोर
तक्रारीनुसार, या कारचा चालक सुधीर सिताराम सावंत (71) असल्याची माहिती समोर आली आहे. याच कारच्या धडकेत आणखी एका स्कूटीस्वारालाही दुखापत झाली असून त्याच्या एका हाताला फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले आहे.
विविध कलमांनुसार गुन्हा दाखल
या प्रकरणी नॅन्सी यांच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 106(1), 125(a), 125(b), 324(4), 281 तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून या अपघाताचा पुढील तपास सुरू असून, अपघाताची नेमकी परिस्थिती, वाहनाचा वेग आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास केला जात आहे.
ADVERTISEMENT












