Meat sale banned every Thursday : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या धार्मिक नगरीत दर गुरुवारी चिकन-मटण विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अक्कलकोट नगरपरिषद प्रशासनाने हा निर्णय अंमलात आणताच शहरात त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. गुरुवारी बहुतांश मांस विक्रीची दुकाने बंद असल्याचे चित्र दिसून आले.
ADVERTISEMENT
अक्कलकोट नगरपरिषदेने कशामुळे घेतला निर्णय?
अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ यांच्या पवित्र स्थळामुळे ओळखले जाते. देशभरातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. या धार्मिक वातावरणाला साजेसे वातावरण कायम राहावे आणि भाविकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, या उद्देशानेच नगरपरिषदेकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास तब्बल पाच हजार रुपयांचा दंड
नगरपरिषदेकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, गुरुवारी मांस विक्री करताना आढळल्यास संबंधित दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन केल्यास तब्बल पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही या निर्णयाबाबत गांभीर्य दिसून येत आहे.
या निर्णयाला शहरातील भाविक आणि नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेकांनी हा निर्णय योग्य असल्याचे सांगत प्रशासनाचे समर्थन केले आहे. काही मांस विक्रेत्यांनी देखील सामाजिक आणि धार्मिक भावना लक्षात घेऊन स्वेच्छेने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, अक्कलकोटमधील या निर्णयामुळे इतर धार्मिक शहरांमध्येही अशा प्रकारचे नियम लागू करण्याबाबत चर्चा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धार्मिक श्रद्धा आणि स्थानिक प्रशासन यांचा समतोल साधत घेतलेला हा निर्णय भविष्यात आदर्श ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











