tukaram mundhe on paneer adulteration : पनीरच्या नावाखाली ग्राहकांच्या आरोग्याशी मोठा खेळ सुरू असल्याचा गंभीर इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. एका राष्ट्रीय अहवालाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, देशात जितक्या प्रमाणात दूधाचे उत्पादन होत नाही, त्यापेक्षा अधिक प्रमाणात दूधाची विक्री होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणारे पनीर नेमके कुठून येते, हा प्रश्न प्रत्येक ग्राहकाने स्वतःला विचारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पनीर तयार करण्यासाठी साधारणपणे पाच ते सहा लिटर दूध लागते. दूधाचा दर प्रतिलिटर 60 रुपये गृहीत धरला, तरी केवळ दुधाची किंमतच सुमारे 300 ते 350 रुपये होते. त्यानंतर प्रक्रिया, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि इतर खर्च धरल्यास पनीरची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी असणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बाजारात 200 ते 250 रुपयांत मिळणारे पनीर सुरक्षित असू शकत नाही आणि त्यामध्ये निश्चितच भेसळ असण्याची शक्यता असल्याचा इशारा त्यांनी दिला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सुनेत्रा पवारांसमोर अडचण, एक नोटीस आणि NCPचं राष्ट्रीय अध्यक्षपद जाणार?
'पनीर हे शंभर टक्के दूधापासून तयार होते'
अधिकारी तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, पनीर हे शंभर टक्के दूधापासून तयार होणारे दुग्धजन्य उत्पादन आहे आणि त्यामध्ये अन्य कोणत्याही पदार्थाला स्थान नसावे. मात्र, स्वस्त दरात मिळणाऱ्या पनीरमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जात असल्याचे तपासणीत समोर आले आहे. गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या तपासणीत जवळपास 40 टक्के पनीरमध्ये भेसळ आढळून आल्याचा दावा त्यांनी केला. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रसायनांचाही वापर आढळल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे केवळ स्वस्त असल्यामुळे असे पनीर खरेदी करणे धोकादायक ठरू शकते. अशा संशयास्पद पदार्थांचे सेवन करण्यापेक्षा ते न खाणेच अधिक योग्य असल्याचे सांगत त्यांनी ग्राहकांनी किंमतीच्या मोहापेक्षा आरोग्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.
हेही वाचा : Personal Finance: इथेनॉलची मागणी वाढणार, आता ‘त्या’ कंपन्यांचे शेअर्स खरेदी करावे का?
'अन्न हे दिसण्यासाठी नव्हे तर सुरक्षितपणे खाण्यासाठी असते'
हॉटेल्स आणि मोठ्या खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर सुरू असलेल्या कारवायांबाबत बोलताना मुंढे यांनी अनेक ठिकाणी स्वच्छतेचे गंभीर उल्लंघन आढळल्याचे सांगितले. काही ठिकाणी उंदरांचा वावर, अस्वच्छ परिसर आणि अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत स्वच्छतेचा अभाव दिसून आल्याचे त्यांनी नमूद केले. ग्राहक बाहेर जेवताना सर्वप्रथम पदार्थाची किंमत पाहतात, मात्र त्याऐवजी उत्पादनातील घटक, त्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासण्याची सवय लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आकर्षक रंग, चमकदार दिसणारे पदार्थ किंवा रंगीत बिर्याणी म्हणजे दर्जेदार अन्न असे समजणे चुकीचे आहे. अन्न हे दिसण्यासाठी नव्हे तर सुरक्षितपणे खाण्यासाठी असते, त्यामुळे कृत्रिम रंग किंवा अनावश्यक रसायनांचा वापर असलेल्या पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्लाही तुकाराम मुंढे यांनी दिला.
अन्नसुरक्षा आणि मानके कायद्याचा उद्देश ग्राहकांना सुरक्षित अन्न मिळावे हा असल्याचे सांगत मुंढे यांनी सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. कोणतेही अन्न अस्वच्छ प्रक्रियेत तयार झाले, तर ते असुरक्षित ठरते, अशी कायद्यातील स्पष्ट व्याख्या त्यांनी सांगितली. ग्राहकांनी केवळ एक्सपायरी डेट पाहून थांबू नये, तर उत्पादनातील घटक, पोषणमूल्ये, प्रथिने, फायबर, साखरेचे प्रमाण आणि इतर माहितीही वाचूनच अन्नपदार्थ खरेदी करावेत, असे त्यांनी सांगितले. पॅकेजिंग, प्रक्रिया आणि उत्पादनाशी संबंधित विविध मानकांचे पालन करणे उत्पादकांची जबाबदारी असून, नागरिकांनीही जागरूक ग्राहक म्हणून सुरक्षित अन्नाची निवड करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी या विशेष मुलाखतीत स्पष्ट केले.
ADVERTISEMENT












