tukaram mundhe exclusive : महाराष्ट्रात अन्नभेसळ, बनावट उत्पादने आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणारे अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत आले आहेत. मुंबई Tak ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी, दुधातील भेसळ, ग्राहकांची जबाबदारी आणि प्रशासनाची भूमिका यावर सविस्तर भाष्य केले. विशेषतः दुधातील भेसळीचे वाढते प्रकार अत्यंत गंभीर आणि भीतीदायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवजात बालकापासून लहान मुलांपर्यंत दूध हा प्रमुख आहार असल्याने त्यामध्ये होणारी भेसळ ही थेट जनतेच्या आरोग्यावर परिणाम करणारी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Maharashtra Weather : मुंबईसह काही ठिकाणी पावसाची स्थिती, IMD विभागाचा अंदाज
भेसळ करण्यासाठी शॅम्पू, साबण आणि डिटर्जंटचाही वापर
तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या मोठ्या दुधाच्या रॅकेटचा उल्लेख करताना, त्यामध्ये सिंथेटिक दूध तयार करण्यासाठी पाम ऑईल, इतर तेल, स्किम मिल्क पावडर आणि विविध रसायनांचा वापर होत असल्याचे सांगितले. काही ठिकाणी शॅम्पू, साबण आणि डिटर्जंटचाही वापर करण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारे तयार होणाऱ्या कृत्रिम दुधाची उत्पादन किंमत गायीच्या दुधासाठी सुमारे 15 रुपये प्रतिलिटर आणि म्हशीच्या दुधासाठी सुमारे 30 रुपये प्रतिलिटर इतकी असल्याचे त्यांनी नमूद केले. हे दूध म्हणजे विषच बाजारात विकले जात असून, केवळ नफा कमावण्यासाठी लोकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारचे कृत्य दहशतवाद्यांपेक्षाही कमी नसल्याचे कठोर शब्दांत त्यांनी मत व्यक्त केले.
हेही वाचा : Exclusive: ...तर थेट जन्मठेप! तुकाराम मुंढेंचा मोठा इशारा, दूधात भेसळ करायचा विचार विसरून जा!
कोणते दूध खरेदी करावे? तुकाराम मुंडेंचा सल्ला
दुधाची शुद्धता टिकवण्यासाठी संपूर्ण साखळीमध्ये तपासणी होणे अनिवार्य असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्याकडून दूध संकलन केंद्रात येते, तेथून चिलिंग सेंटर आणि पुढे डेअरी प्लांटपर्यंत प्रत्येक टप्प्यावर दूध तपासले जाणे आणि त्याची नोंद ठेवणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. निकृष्ट किंवा असुरक्षित दूध तात्काळ नाकारले जाऊन ते प्रणालीबाहेर काढणे आवश्यक आहे. प्रत्येक टप्प्यावर तपासणी करून रेकॉर्ड ठेवण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ग्राहकांनी केवळ ब्रँडच्या नावावर विश्वास न ठेवता पॅकेजवरील घटक, फॅटचे प्रमाण, एसएनएफ, पॅकेजिंग तारीख, 'बेस्ट बिफोर' आणि एक्सपायरी डेट यांसारखी माहिती वाचूनच दूध खरेदी करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
मुंढे यांनी सांगितले की, अन्न व औषध प्रशासनाच्या इतिहासात प्रथमच त्यांनी दूध उद्योगाशी संबंधित सर्व घटकांची बैठक घेऊन कायद्याचे नियम, त्यांचे परिणाम आणि सार्वजनिक आरोग्यावरील दुष्परिणाम यांची माहिती दिली. महाराष्ट्रातील सुमारे 32 टक्के दूध नमुने हे सबस्टँडर्ड किंवा असुरक्षित असल्याचा राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणातील डेटा त्यांनी संबंधितांना दाखवला. त्यानंतर अनेक संकलन केंद्रे आणि चिलिंग सेंटर बंद झाल्याचेही त्यांनी नमूद केले. असुरक्षित अन्नपदार्थांबाबत कायद्यात जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असून अशा प्रकरणांमध्ये खटला दाखल करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुधातील भेसळ रोखण्यासाठी तपासणी अधिक वाढविण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT












