Monsoon Update : राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा तसेच पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. पुणे जिल्हातील काही भागांत पाणी साचलं असून दौड तालुक्यातील कुरकंभ येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांना ट्राफिकचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे पुणे -सोलापूर महामार्गावरील पाटस येथे ढगफुटी सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. याच परिस्थितीमुळे शेतीचे नुकसान झालेलं आहे. तसेच बीड आणि संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यांमधील संपर्क तुटला आहे. तर सिन्नर बस स्थानकाचा स्लॅब शिवशाही बसवर कोसळला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Mansoon update : 12 दिवसांआधीच राज्यात मान्सून दाखल, मुंबई-पुण्यात काही तासांतच धडकणार
साताऱ्यात पावसाचा हाहाकार
साताऱ्यात पावसाने थैमान घातलं आहे. फलटण तालुक्यातील धुमाळवाडी येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे धुमाळवाडी गावाचा एकूण 35 गावांशी संपर्क तुटला आहे. फळांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडीवर मुसळधार पावसाचे संकट ओढावले आहे. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यात पाऊस थांबायचं नाव घेत नाही. यामुळे कोयना धरणातील पाणी हे ओव्हफ्लो झाले आहे.
पुणे जिल्ह्यात ढगसदृश्यस्थिती
साताऱ्यानंतर पुणे जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दौंड तालुक्यातील पाटसमध्ये ढगफुटी सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. तर कुरकुंभमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना ट्राफिकचा सामना करावा लागत आहे. तसेच या पावसामुळे काही छोटे पूल हे पाण्याखाली गेले आहेत. तसेच वाहत्या पाण्यामध्ये एक कार वाहून गेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पालघरमध्येही पावसाचं थैमान
पालघरमध्ये मध्यरात्रीपासून पाऊस थांबायचं नाव घेत नाही. आज दिवसभर पावसाने पालघर जिल्ह्यामध्ये दमदार बॅटिंग केली आहे. यामुळे पालघरमध्ये काढणीसाठी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच पालघर जिल्ह्यात सर्वाधिक वीट भट्टींचे प्रमाण आहे. मात्र, या मान्सूनने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पळवला आहे. त्यामुळे केवळ पालघरच नाहीतर राज्यातील बळीराजा सध्या चिंतेत आहे.
बीड आणि संभाजीनगर जिल्ह्यांचा संपर्क तुटला
गेल्या आठ दिवसांपासून सुरु असणाऱ्या अवकाळी पावसाने बीडमधील पर्यटनस्थळ असणाऱ्या कपिलधारा धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहू लागला. दरम्यान, मुसळधार पावसाने बीड आणि संभाजीनगर या दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जोडल्या जाणाऱ्या पुलाचे बांधकाम सुरु होते. मात्र, बांधकाम सुरु असणारा पूल कोसळल्याने आता नागरिकांना दहा किमी अंतर अधिकचा प्रवास करावा लागणार आहे. यामुळे बीड आणि छत्रपती संभाजीनगरचा संपर्क तुटल्याचं बोललं जात आहे.
जनावरांचा कोठा गेला उडून
वाशीममध्ये पिंपळगावातील एका शेतकऱ्याच्या जनावरांचा कोठाच उडून गेला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. जनावरांसाठी साठवण्यात आलेला चारा पावसामुळे भिजून गेला आहे. काही शेतकऱ्यांचे गोठे कोसळल्याने जनावरांनाही दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : Pune Crime : 'पांढऱ्या पायाची, जा तुझ्याबापाकडून कार...' वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंडाबळीचं आणखी एक प्रकरण समोर
सिन्नर बसस्थानकाचा स्लॅब कोसळला
तर कोकणातील सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने काढणीसाठी आलेल्या पिकांचे नुकसान झालं आहे. काही भागांमध्ये पावसाचे पाणी साठून पाण्याचे लोट वाहू लागले आहे. तसेच सिन्नर स्थानकाचा सहा नंबर प्लॅटफॉर्मचा स्लॅब शिवशाही बसवर कोसळला आहे. त्याचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. खबरदारी म्हणून बसस्थानक रिकामं करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना देखील बाहेर काढण्यात आले असून या घटनेमुळे सिन्नर शहरातील काही रस्ते बंद झाले असून, वाहतूक ठप्प झाली आहे.
ADVERTISEMENT
