मुंबई : खार परिसरात फ्रान्सच्या तरुणीचा विनयभंग करून पसार झालेल्या आरोपीला अखेर खार पोलिसांनी पकडलं आहे. अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव सुनिल विष्णू वाघेला (वय 25) असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यानंतर स्कूटीच्या नोंदणी क्रमांकाचा माग काढला. धारावी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आलं असून आता तो पोलीस कोठडीत आहे. पुढील चौकशीतून आणखी काही तपशील स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ADVERTISEMENT
घटना कशी घडली?
तक्रारदार तरुणी वांद्रे येथे राहत असून ती व्यावसायिकरित्या फ्रेंच भाषा शिकवते. गेल्या आठवड्यात ती खारमधील एका मैत्रिणीकडे आली होती. रात्री साडेबारा च्या सुमारास ती मैत्रिणीच्या घरातून निघाली आणि मुख्य रस्त्यावरून पायी चालत घरी रवाना होत होती. रस्ता तुलनेने शांत असताना एका स्कूटीवरून आलेल्या युवकाने तिचा पाठलाग केल्याचं दिसून आलं.
तरुणी काही अंतर पुढे गेल्यानंतर आरोपीने स्कूटी थांबवून तिच्या समोर येत अचानक तिच्या छातीला अयोग्य स्पर्श केला. घटना अचानक घडल्यामुळे ती घाबरली आणि मदतीसाठी ओरडण्याचा प्रयत्न करत असतानाच आरोपी स्कूटीवर बसून वेगाने पळून गेला. रात्रीच्या वेळेमुळे आसपास कोणी नसल्याने तो सहज पळ काढू शकला.
हेही वाचा : पालघर साधू हत्याकांडातील आरोपीचा भाजपमध्ये प्रवेश, 5 वर्षानंतर झाला पवित्र
तक्रार आणि तपासाची सुरुवात
दरम्यान, पीडितेने थेट खार पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला आणि घडलेली संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. तरुणीच्या तक्रारीवर तत्काळ विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज गोळा करून तपास सुरू केला. घटनास्थळाजवळील एका कॅमेऱ्यात स्कूटीचा स्पष्ट व्हिडिओ मिळाल्याने तपासाला दिशा मिळाली.
फुटेज झूम करून त्यावरील नोंदणी क्रमांक स्पष्ट करण्यात आला. या क्रमांकावरून वाहनमालकाची माहिती शोधण्यात आली आणि त्यातून सुनिल विष्णू वाघेला याचं नाव समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या हालचालींचा माग काढत धारावी परिसरातून त्याला अटक केली.
कोठडी आणि पुढील तपास
सुनिल वाघेलाला पकडल्यानंतर त्याची औपचारिक चौकशी करण्यात आली. नंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली. तपास अधिकारी सांगतात की, आरोपीने गुन्हा केल्यानंतर स्कूटी लपवण्याचा प्रयत्न केला होता. त्याने एकट्याने हा प्रकार केला का, की आणखी कोणी त्याला मदत करत होते, याची पडताळणी सुरू आहे.
खार पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात अजून काही तांत्रिक पुरावे जमा केले जात आहेत. आसपासच्या इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधूनही अतिरिक्त फुटेज मिळवले जात असून आरोपीचा अचूक प्रवास मार्ग, गुन्ह्यापूर्वी आणि नंतरची हालचाल तपासली जात आहे. या घटनेमुळे खार परिसरातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून रात्रीच्या वेळी फिरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
BMC निवडणुकीआधी फडणवीसांची सगळ्यात मोठी खेळी, उद्धव ठाकरेंना दिलं ‘ते’ पद, सोबत आदित्य ठाकरेंनाही…
ADVERTISEMENT











